जिल्ह्यात ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येणार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने 2024 वर्षात एकूण 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर याप्रकरणी 16 गुन्हे नोंद झाले आहेत.
सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने 2024 वर्षात एकूण 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर याप्रकरणी 16 गुन्हे नोंद झाले आहेत. नवीन वर्षात लोकांमध्ये जागृती होण्यासाठी जिल्ह्यात ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘लाचलुचपत’चे उपाधिक्षक राजेश वाघमारे यांनी दिली.
सातारा येथे पत्रकार परिषदेत राजेश वाघमारे बोलत होते. वाघमारे पुढे म्हणाले, 2023 या वर्षात जिल्ह्यात लाच मागणीचे 14 गुन्हे नोंद झाले होते. यावर्षी एक जानेवारी ते 31 डिसेंबरअखेरपर्यंत 16 गुन्हे नोंद आहेत. यामध्ये 25 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. वर्ग एकच्या तीन अधिकार्यांीविरोधात कारवाई झाली आहे. तर वर्ग दोनच्या दोन अधिकारी, वर्ग तीनच्या 14 अधिकार्यांनना पकडण्यात आले आहे. तसेच इतर 2 लोकसेवक आणि खासगी चार व्यक्तीवरही लाचलुचपतप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे.
लाचप्रकरणी महसूल विभागात चार कारवाया झाल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग 1, भूमी अभिलेख विभाग 2, नगरविकास 1, शिक्षण विभाग 1, विधी व न्याय विभाग 2 आणि वीज कंपनीत 3 कारवाया झाल्या आहेत. आता 2025 या नवीन वर्षातही कारवाया गतिमान करण्यात येणार आहेत. यासाठी लोकांनी शासकीय कामासाठी पैशाची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार द्यावी. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवेल, असे आवाहनही वाघमारे यांनी केले आहे.