मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागणार्या महिलेस 3 दिवसांची कोठडी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणार्या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना काल दि. 22 रोजी सातारा पोलिसांनी अटक केली होती.
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणार्या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना काल दि. 22 रोजी सातारा पोलिसांनी अटक केली होती. या महिलेला आज न्यायालयासमोर हजर केले असता तिला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप झाल्याने ऐन अधिवेशनादरम्यान, खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणावरून मंत्री गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी हे जुने प्रकरण असून, या प्रकरणी कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते.
मात्र जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणामध्ये तडजोड करण्यासाठी संबंधित महिलेने 3 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, त्यानंतर यामधील एक कोटी रुपये घेताना या महिलेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात कॉंग्रेसचे विराज शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.
आज दि. 22 रोजी सकाळी संबंधित महिलेला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पठाण यांच्यासमोर सातारा पोलिसांकडून हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने ऍड. बांदल यांनी, तर बचावपक्षाच्यावतीने ऍड. नितीन गोडसे यांनी कामकाज पाहिले. बांदल यांनी याप्रकरणी 7 दिवसांची पोलीस कोठडीची जोरदार मागणी केली. या दोन्ही वकिलांचा जोरदार युक्तिवाद न्यायालयासमोर झाल्यानंतर न्या. पठाण यांनी संबंधित महिलेस दि. 24 पर्यंत कोठडी सुनावली आहे.