खुनाच्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये राहुल यादव याला पुन्हा अटक
सासपडे, तालुका सातारा येथील दुर्दैवी एका अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी सातारा पोलिसांच्या अटके मध्ये असणाऱ्या राहुल यादव या आरोपीने यापूर्वी देखील गावातीलच एका अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे.
सातारा : सासपडे, तालुका सातारा येथील दुर्दैवी एका अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी सातारा पोलिसांच्या अटके मध्ये असणाऱ्या राहुल यादव या आरोपीने यापूर्वी देखील गावातीलच एका अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्या अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात पुन्हा एकदा त्याला अटक केली आहे.
दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी यादव याने एका अल्पवयीन मुलीवर निर्दयी पद्धतीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करून खून केला होता. या प्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. या प्रकरणाच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व धोंडीराम वाळवेकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर यादव याला अटक करून तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल बबन यादव याने दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी सासपडे गावातील आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आणि तो मृतदेह विहिरीत टाकला असल्याची कबुली दिली आहे.
बोरगाव पोलिसांनी हा गुन्हा फेरतपासावर घेऊन या प्रकरणात ३०२, ३७६, २०१ ही कलमे दाखल केली.
गुरुवार दिनांक 30 रोजी या खुनाच्या संदर्भाने बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये यादव याच्या विरोधात गुन्हा नोंद करून या आरोपीचा ताबा मिळण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातारा यांना लेखी रिपोर्ट देण्यात आला. या गुन्ह्यात स्वतंत्र अटक दाखवून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत.