क्रेन चोरट्याच्या मल्हार पेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कराड येथील क्रेन चोरी गुन्ह्यामधील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात मल्हारपेठ पोलिसांना यश आले आहे.
सातारा : कराड येथील क्रेन चोरी गुन्ह्यामधील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात मल्हारपेठ पोलिसांना यश आले आहे.
रवींद्र विठ्ठल चोरगे रा. चोरगेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दि. 19 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मल्हार पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहाय्यक फौजदार प्रदीप साळवी, पोलीस हवालदार संजय मोरे, प्रदीप निकम पेट्रोलिंग करीत असताना मरळी, ता. पाटण गावच्या हद्दीत सुतारमळा येथे टोइंग क्रेन क्र. एमएच 09 सीए 6306 ही उभी असल्याचे दिसली. याबाबत संशय आल्याने क्रेन चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यातील सात लाख रुपये किंमतीची टोइंग क्रेन कराड येथून चोरी केली असल्याची कबुली दिली. याबाबत माहिती घेतली असता कराड शहर पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितास पुढील कारवाई करता कराड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पाटण विभागाचे पोलीस उपाधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहाय्यक फौजदार प्रदीप साळवी, पोलीस हवालदार संजय मोरे, प्रदीप निकम यांनी केली आहे.