पोलिस असल्याच्या बतावणीने दागिने लुटणाऱ्या टोळीचा हैदोस
सातारा शहरात अनोळखी दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांकडून सोन्याचे दागिने हातचलाखीने लांबवण्याच्या दोन सलग घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सातारा : सातारा शहरात अनोळखी दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांकडून सोन्याचे दागिने हातचलाखीने लांबवण्याच्या दोन सलग घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना सोमवार पेठ, फुटका तलावाजवळ
वर्षा चंद्रकुमार आसराणी (वय ६०, राहणार सोमवार पेठ) या महिलेस दोन इसमांनी अचानक "आम्ही पोलिस आहोत, परिसरात चोरी झाली आहे" असे सांगितले. संशय निर्माण करून त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कागदात गुंडाळून ठेवा असे सांगितले.
या महिलेने कागदात गुंडाळण्याचा प्रयत्न करताच इसमांनी हातचलाखी करत खरी सोन्याची बांगडी चोरून तिच्या ऐवजी पितळी बांगडी ठेवली आणि तेथून तत्काळ पळ काढला.
दुसरी घटना शनिवार पेठ येथे १० डिसेंबर रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास घडली. यामध्ये अरुणा शिवाजी देवकर (वय ६१) यांनाही हाच डाव लावण्यात आला. "पोलीस तपास सुरू आहे" असे सांगून त्यांच्या गळ्यातील मोठे मंगळसूत्र व मणीचे मंगळसूत्र कागदात काढून देण्यास सांगितले.
अनोळखी दोघांनी हातचलाखीने खोटे दागिने पर्समध्ये ठेवून खरे दागिने घेऊन पळ काढला.यामध्ये एकूण 1 लाख 95 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले आहे. दोन्ही घटनांची सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून याबाबतचा अधिक तपास हवालदार कांबळे करत आहेत.