सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचा 24 तासात उलगडा
सासपडे, ता. सातारा येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सातारा : सासपडे, ता. सातारा येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांनी संशयिताला जेरबंद केले असून खुनाचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
राहुल बबन जाधव वय 34, रा. सासपडे, ता. सातारा असे जेरबंद करण्यात आलेल्या खुनी संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१० रोजी दुपारी साडेबारा ते तीन वाजण्याच्या सुमारास सासपडे तालुका सातारा येथे एका शालेय अल्पवयीन मुलीचा अज्ञाताने घरात घुसून खून केल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि देवकर तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांना संबंधिताला अटक करण्याच्या सूचना दिल्या.
त्याप्रमाणे पथके तयार करून तपास पथकांनी सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी घटनास्थळ हे गावातील रहदारीचे ठिकाणी असून आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तपास पथकाने इतरत्र माहिती मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, खबरेही पेरले. मात्र माहिती उपलब्ध झाली नाही.
मात्र आज दि. 11 रोजी या गुन्ह्यातील संशयित हा सासपडे ते नागठाणे जाणाऱ्या रस्त्यावरील एका टेकडीवर असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली त्याप्रमाणे त्यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस हवालदार अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, रविराज वर्णेकर यांचे तपास पथक तयार करून पथकास संबंधिताला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकाने संबंधिताचा सासपडे नागठाणे रस्त्यावरील टेकडीवर शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. संबंधिताकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्य पूर्ण व सखोल चौकशी केल्यास त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अशा रीतीने अल्पवयीन मुलीच्या या खुनाची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांना यश आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, संतोष सपकाळ, मंगेश महाडिक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, पंकज बेसके, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, रविराज वर्णेकर, संभाजी साळुंखे, तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस अंमलदार निलेश गायकवाड, प्रशांत चव्हाण, सतीश पवार, विशाल जाधव, समाधान जाधव, महिला अंमलदार नम्रता जाधव यांनी सहभाग घेतला.