साताऱ्यात केअरटेकर महिलेकडून पाच तोळे दागिन्यांची चोरी
साताऱ्यात गुरुवार पेठ येथे वृद्ध महिलेला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या केअरटेकर महिलेला आणि तिच्या साथीदाराला सातारा शहर पोलिसांनी पकडले आहे.
सातारा : साताऱ्यात गुरुवार पेठ येथे वृद्ध महिलेला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या केअरटेकर महिलेला आणि तिच्या साथीदाराला सातारा शहर पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. जहिरा रफिक शेख वय 50 रा. प्रतापगंज पेठ, राधिका चौक व शैलेश हरिभाऊ साळुंखे वय 49 रा. 221 गुरुवार पेठ अशी संबंधित संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी, गुरुवार पेठ येथे एका वृद्ध महिलेच्या देखभालीसाठी संशयित महिलेला ठेवण्यात आले होते. दि. 14 ऑक्टोबर रोजी या महिलेने वृध्देला मसाज दिला. त्यानंतर तिला संधीवाताचे इंजेक्शन आहे, त्याने त्रास कमी होईल, असे सांगून तिला इंजेक्शन दिले. इंजेक्शन मुळे वृद्ध महिला बेशुद्ध पडली. त्यावेळी तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या बांगड्या केअर टेकर महिलेने लांबविल्या. वृध्देच्या घरातून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने वृध्देच्या नातेवाईकांनी घरी येऊन तिला शुद्धीवर आणल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
या संदर्भात दि. 21 ऑक्टोबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. वृद्ध महिलेने सोन्याच्या बांगड्या कुठे ठेवल्या, हे आठवत नसल्याचे सांगितले. नातेवाईकांनी केअरटेकर महिलेकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. गेल्या पंधरा वर्षापासून मी या व्यवसायात आहे. मी असे करू शकत नाही, असे ठामपणे महिलेने सांगितले. सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष चौकशीचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे आणि त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण चौकशी केली असता प्रश्नोत्तरांच्या सरबत्तीने महिला गडबडली. यापूर्वी पथकाने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून अनेक तपशील तिचा गोळा केला होता. कसून चौकशी झाल्यानंतर सातारा पोलिसांसमोर सदर महिलेने आपल्या साथीदाराच्या मार्फत हा प्रकार केल्याचा गुन्हा कबूल केला. या महिलेला इंजेक्शन देण्यासंदर्भात आणि औषध देण्यासंदर्भात माहिती होती. महिलेने डायबिटीस कमी करण्याचे इंजेक्शन मेडिकल मधून घेऊन ते संधिवाताचे इंजेक्शन असल्याचे खोटे सांगितले. इंजेक्शनची मात्रा जास्त झाल्याने शुगर लेवल कमी होऊन सदर वृद्ध महिला बेशुद्ध पडली होती. केअरटेकर महिलेने वृद्ध महिलेच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. यामध्ये तिला या गुन्ह्यामध्ये साथीदाराने मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेने यापूर्वी असे कुठे केले आहे काय, याबाबतची माहिती घेतली जात आहे.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, सतीश मोरे, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिठे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.