सातारा जिल्ह्यातून दोन जण दोन वर्षांसाठी तडीपार
सातारा शहर व शाहूपुरी परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी केली आहे.
सातारा : सातारा शहर व शाहूपुरी परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी केली आहे. तडीपार झालेल्यांमध्ये स्मितेश उर्फ सागर दिलीप उंबरकर (वय २८, रा. मोळाचा ओढा, सैदापूर, सातारा), नरेश शेरसिंग सुनार (वय १९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या दोघांवर दरोडा, जबरी चोरी, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, अवैध शस्त्रांचा वापर, लोकांवर कोयत्याने वार करणे, शस्त्रबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, दुखापत करणे तसेच शिवीगाळ-दमदाटी करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. या दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली. शहर व परिसरातील नागरिकांचा वाढता त्रास, गुन्हेगारी कारवाया व कायद्याचा धाक न उरल्याने या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुनावणी घेऊन दोघांना संपूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. आगामी काळात सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर तडीपार, मोक्का, एमपीडीए अशा कठोर कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तसेच पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पो.हवा. सचिन माने, राहुल दळवी, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.