फलटणमधील एका लॉज मध्ये डॉक्टर महिलेची आत्महत्या
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे.
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य एकावर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर याने गेली पाच महिने माझा सतत शारीरिक व मानसिक छळ केला.” या धक्कादायक खुलाशानंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
फलटण तालुक्यातील महिला सरकारी डॉक्टर आत्महत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. डॉक्टरच्या तळहातावर सुसाईड नोट सापडली असून त्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि आणखी एका व्यक्तीचे नाव नमूद आहे. या दोघांविरोधात मानसिक, शारीरिक छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना झाली असून संबंधित उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
गुरुवार रात्री फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. डॉक्टरने हॉटेलची खोली बुक केली होती. बराच वेळ संपर्क होत नसल्याने आणि खोलीचा दरवाजा बंद असल्याने हॉटेल व्यवस्थापनाने त्यांच्याकडील दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता डॉक्टर मृतावस्थेत आढळल्या. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचल्यावर पंचनामा करण्यात आला.
यावेळी मृत महिला डॉक्टरच्या तळहातावर सुसाईड नोट आढळली. घटनास्थळी पेनही सापडले असून हॉटेलचा तीन दिवसांचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला आहे. सुसाईड नोटच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त करणे व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फलटण शहर पोलिसांकडून सुरू आहे. तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात येणार असल्याचे दोशी यांनी सांगितले.
महिला डॉक्टर–पोलिसांमध्ये परस्पर तक्रारी
या घटनेपूर्वी महिला डॉक्टरवर पोलिसांना सोईस्कर अशी वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी दबाव टाकला जात होता काय, असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला असता पोलीस अधीक्षक दोशी म्हणाले, “संबंधित डॉक्टरने तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे काही पोलिसांविरोधात तक्रार केली होती. त्याचप्रमाणे पोलिसांनीही जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तिच्याविरोधात तक्रार केली होती. या दोन्ही प्रकरणांचा थेट संबंध नसावा; मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात आहे. ही आत्महत्या आहे की त्यामागे काही वेगळं कारण आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल,” असे दोशी यांनी नमूद केले.
फॉरेन्सिक टीमचा रात्रीपासून तपास
घटनास्थळी फॉरेन्सिक टीम रात्रीपासून तळ ठोकून कार्यरत आहे. तपासाची तांत्रिक बाजूही बारकाईने तपासली जात असून सर्व पुरावे वैज्ञानिक पद्धतीने संकलित केले जात असल्याचे पोलीस अधीक्षक दोशी यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील महिला सरकारी डॉक्टर आत्महत्याप्रकरणी नवे धक्कादायक आरोप समोर आले आहेत. शवविच्छेदनाचा चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी एका खासदारासह त्यांचे दोन पीए आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता, असा गंभीर आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपानंतर प्रकरणाने नवे वळण घेतले असून पोलिसांनी दबावाला बळी न पडता सत्य परिस्थिती उघड करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
गुरुवारी रात्री फलटण शहरातील हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर तिचे नातेवाईक बीड जिल्ह्यातील मूळगावातून तत्काळ फलटणकडे रवाना झाले. काहीजण पहाटे तीनच्या सुमारास फलटण पोलीस ठाण्यात पोहोचले आणि गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबले. सकाळी मृतदेह सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला; मात्र शवविच्छेदनासाठी तब्बल चार तास वाट पाहावी लागल्याने नातेवाईकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संशयितांना अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली.
जुन २०२५ मध्ये खासदार, पीएंच्या विरोधात तक्रार
मृत डॉक्टरने जुन २०२५ मध्ये तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. त्यात एका खासदारासह त्यांचे दोन पीए आणि आणखी काही व्यक्तींचा उल्लेख आहे. “खासदारांचे पीए आधी फोन करायचे आणि त्यानंतर खासदार थेट बोलायचे,” असा गंभीर आरोप नातेवाईकांनी करत सखोल तपास करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
नातेवाईकांनी पोलिसांवर एफआयआर नोंदवण्यात जाणूनबुजून टाळाटाळ केल्याचाही आरोप केला आहे. “आम्ही सकाळी सातपासून पोलीस ठाण्यात होतो, पण बारा वाजेपर्यंत गुन्हा नोंद झाला नाही. आरोपींमध्ये पोलिसांचे नाव असल्यानेच विलंब केला जात होता,” अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
त्रासाबद्दल बहिणीला दिली होती कल्पना
मृत महिला डॉक्टरने आपल्या बहिणीला, जी देखील वैद्यकीय अधिकारी आहे, सतत होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. त्यावेळी तिने कराराचा कालावधी संपल्यानंतर नोकरी सोडण्याचाही विचार व्यक्त केला होता, असे नातेवाईकांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांकडून आश्वासन
शवविच्छेदन गृहाबाहेर प्रतीक्षा करणाऱ्या नातेवाईकांची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भेट घेऊन समजूत काढली. त्यांनी तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवून सत्य परिस्थिती उघड करण्याचे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख आणि राष्ट्रीय काँग्रेस महिला सातारा जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे उपस्थित होत्या. दोघांनीही तपास जलद गतीने करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.