जकातवाडी येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त
जकातवाडी, ता. सातारा येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत. येथील लाभार्थ्यांना तीन-तीन महिने फक्त निम्मेच राशन मिळत असून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकडे या दुकानदाराचे लक्ष असल्याने या दुकानदाराविरोधात प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
सातारा : जकातवाडी, ता. सातारा येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत. येथील लाभार्थ्यांना तीन-तीन महिने फक्त निम्मेच राशन मिळत असून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकडे या दुकानदाराचे लक्ष असल्याने या दुकानदाराविरोधात प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
भारतातील लाखो कुटुंबांसाठी रेशन ही जीवनरेखा आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी काढलेल्या शिधावाटप योजनेमुळे लाखो जिवांच्या जेवणाची भ्रांत मिटते. रेशन केवळ स्वस्त किंवा मोफत अन्नधान्याची हमी देत नाही तर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक आवश्यक दस्तऐवज देखील आहे. रेशन वितरण व्यवस्था मजबूत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. रेशनचे फायदे फक्त योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी रेशन दुकानदारांवरही सरकारने कडक नियम बनवले आहेत. या नियमांमध्ये रेशनिंगच्या नियमानुसार बीपीएल् व अंत्योदयचे धान्य हे आपल्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते, स्वस्त धान्य दुकानामध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा काही नियम नाही, रेशनिंगच्या नियमानुसार स्वस्त धान्य दुकानामध्ये घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे, कारण पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो, रेशनिंगच्या नियमानुसार दुकानदाराला रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही, रेशनिंगच्या नियमानुसार स्वस्त धान्य दुकानामध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक असले पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भाव व देय प्रमाण उपलब्ध असलेला कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. रेशनिंगच्या नियमानुसार बीपीएल् व अंत्योदयचे धान्य जर आपण मागील महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते. स्वस्त धान्य दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास चालू असलेच पाहिजे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी चालू असले पाहिजे, असे त्यातील काहीच नियम इथे मांडतो. त्याला कारणही तसेच आहे.
जकातवाडी, ता. सातारा येथे रघुनाथ लक्ष्मण माने यांचे रेशनिंगचे दुकान आहे. या दुकानातून लाभार्थ्यांना शिधा वाटप केले जाते. या दुकानाकडून गरजूंना त्यांच्या युनिटनुसार शिधा देणे हे दुकानदारासाठी क्रमप्राप्त असताना. रघुनाथ माने हे गरजूंना खालच्या दर्जाची वागणूक देतात. खरेतर हे दुकान म्हणजे माने यांच्यासाठी ब्रेड आणि बटर आहे. रेशन दुकानातून तुम्ही इतर कोणताही व्यवसाय करु शकत नाही, हा नियम असताना त्यांनी त्यांच्या दुकानात इतरही जिन्नस विक्रीस ठेवले आहेत. त्यामुळे गरजूंना कमी धान्य देवून आपल्या दुकानात ते धान्य खपवले जात असल्याचा दाट संशय जकातवाडी ग्रामस्थांना आहे. काही गरजू लाभार्थ्यांना काहीही कारण सांगून त्यांना शिधा नाकारणे, ग्राहकांशी उद्धट बोलून त्यांच्यावर आपण उपकार करीत असल्याच्या भावनेतून त्यांना वागणूक देणे. तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या गरजूंसाठी ही योजना अंमलात आणली, त्या गरजूंना तीन-तीन महिने त्यांच्या युनिटनुसार धान्य न देणे.
सातारा शहरातील काही रेशन दुकानदार धान्य आल्यानंतर गरजूंना फोन करुन धान्य घेवून जाण्यासाठी आग्रह करतात. हे दुकानदार अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, माने यांच्यासारखे दुकानदार गरजूंना धान्यापासून वंचित ठेवत आहेत, हा एक सामाजिक गुन्हाच मानावा लागेल. जर एखादेवेळेस धान्य कमी आले तर लाभार्थ्यांना विश्वासात घेवून त्यांना पुन्हा धान्य देणे क्रमप्राप्त असताना हे महाशय एवढेच आले आहे, एवढेच घ्या... असे म्हणून त्या गरजूची बोळवण करीत आहेत. त्यांनी वाटप केलेल्या त्या एवढ्याशा धान्यात तो परिवार कसा महिना काढेल, याची कल्पनाच केलेली बरी. कारण शिधापत्रिकेवरुन धान्य घेणारे कोणतेही करोडपती नसून ते फक्त गरजू, आर्थिक चणचणीशी सामना करणारे जीव आहेत, हे या दुकानदाराला कळायला हवे.
एवढे होवून नंतर आलेले धान्य नक्की जाते कोठे, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. कारण दुकानाच्या युनिटनुसार सरकारकडून धान्य तर येते. मग हे नंतर आलेले धान्य कुठे जाते, याचे उत्तर शेंबडे पोरही देईल. माने यांच्या दुकानात किती धान्य आले, किती शिल्लक आहे, या माहितीचा बोर्ड नाही. पॉज मशीन कुठे? तर घरी. नोंदवही ठेवणे गरजेचे असताना या महाशयांकडे ही वहीच नाही. पैशाचा हव्यास हवा, पण इतकाही नको. लोकांच्या तोंडचा घास काढून जर तुम्ही तुमच्या तुंबड्या भरत असाल, तर ते नक्कीच योग्य नाही. एका मर्यादेपर्यंत लोक हे सगळे सहन करीत होते. मात्र, रघुनाथ माने यांची आरेरावी आणि मस्तवालपणा एवढा वाढला आहे की, त्यांच्या दुकानाविरोधात काही गरजू लाभार्थी आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यांच्या सगळ्या कुलंगड्यांची जंत्रीच काहीजण जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासमोर ठेवणार आहेत. त्यामुळे होणार्या कारवाईस माने यांनी तयारच रहावे.