बोगस कांदा बियाणाचा शेतकर्यांना फटका
कांद्याच्या दरवाढीमुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. त्यामुळे कांदा बियाणे व रोपांना मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात बोगस कांदा बियाणाची विक्री करुन शेतकर्यांची फसगत केली जात आहे.
सातारा : कांद्याच्या दरवाढीमुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. त्यामुळे कांदा बियाणे व रोपांना मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात बोगस कांदा बियाणाची विक्री करुन शेतकर्यांची फसगत केली जात आहे. दुबार मशागत व पेरणीमुळे आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. अशा फसवेगिरीला चाप लावण्याची गरज असून कृषी विभागाने लक्ष घालून अशा बोगस बियाणे विक्री करणार्यांची चौकशी करुन कारवाई करावी मागणी होत आहे.
सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. चार ते साडेचार महिन्यांमध्ये नगदी उत्पादन देणारे पीक म्हणून कांदा उत्पादनाकडे पाहिले जाते. मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर भडकल्याने कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. कांदा रोपांनाही मागणी वाढली आहे. विकत रोपे घेवून लागवड करण्याचा खर्च वाढत असल्याने कांदा बियाणे पेरणीला शेतकरी वर्गातून प्राधान्य दिले जात आहे. आधीच परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी हंगामातील पेरणीदेखील उशीरा झाली. त्यातच अवकाळीमुळे पेरणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे कांदा पेरणी उशीरा झाली. मात्र, यामध्ये अनेक शेतकर्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे. जिल्ह्यात अनेक शेतकर्यांनी घरगुती उत्पादित कांदा बियाणे खरेदी केले. मात्र, हे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे वारंवार मशागत, पेरणी व बियाणाची खरेदी यासाठी आर्थिक भुर्दंड बसला आहे. कृषी विभागाने अशा बोगस बियाणे विक्री करणार्यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
आठ एकरात 16 ते 17 किलोची पेरणी
पाटखळ, ता. सातारा येथील काही प्रगतशील शेतकर्यांनी आठ एकरावर कांदा बियाणाची पेरणी केली होती. परिसरातीलच व्यक्तीकडून घरगुती बियाणे खरेदी केले होते. एकरी 2 किलो याप्रमाणे 16 ते 17 किलो बियाणे पेरले. मात्र, बियाणे न उगवल्याने या शेतकर्यांचा मशागत,पेरणीसह बियाणाचा खर्च वाया गेला आहे. संबंधित बियाणे विक्रेत्याने मात्र हात वर करत नुकसानभरपाई देण्यास नकार दिला आहे.
शेतमालाला हमी भाव मिळेना. सोयाबीन दरावाचून घरात पडून आहे. खरीपातील तोटा भरुन काढण्यासाठी कांदा पेरणीचा निर्णय घेतला. मात्र तो न उगवल्याने बियाणे व ट्रॅक्टरने पेरणीसाठी एकरी पाच ते सहा हजार खर्च वाया गेला आहे. महेश बाबर, पाटखळ.