खेड मागासवर्गीयचा निधी वनवासवाडीकडे वळवला
सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्तीसाठी ४५ लाख रुपये निधी वनवासवाडी मध्ये वळवला.
सातारा : सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्तीसाठी ४५ लाख रुपये निधी वनवासवाडी मध्ये वळवला. याबद्दल सातारा गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनील शिंदे यांनी अर्धनग्न आंदोलन केले.
खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्ती येथील ग्रामस्थ सुनील शिंदे यांनी गट विकास अधिकारी यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, समाज कल्याणचा ४५ लाख रुपयांचा निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्यासाठी वापरण्यात येणार होता. परंतू तो निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये न वापरता वनवासवाडी गावात जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वापरण्यात आला आहे. या संदर्भात विविध अधिकाऱ्यांसोबत पत्र व्यवहार केला पण दखल कोणीच घेतलेली नसल्याने गट विकास अधिकाऱ्यांनी जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून कामाला परवानगी दिली आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी कराबी आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय करणाऱ्या गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून उठणार नाही, असे सुनील शिंदे यांनी सांगितले.