उपाशीपोटी बैठे काम करणारे होतात मधुमेहाचे शिकार
मुंबईसारख्या महानगरामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप २ हा प्रकार वाढत आहे.
मुंबई : World Diabetes Day 2024 | मुंबईसारख्या महानगरामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप २ हा प्रकार वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जागतिक मधुमेह दिन निमित्ताने १४ नोव्हेंबरपासून मधुमेह आणि आहार विषयक जनजागृती राबविण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महापालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅमपेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिसची टक्केवारी १५ टक्के आहे. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो. विशेष मोहिम म्हणून रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र एनसीडी कॉर्नर ऑगस्ट २०२२ पासून २६ रुग्णालयांमध्ये सुरु करण्यात आले. यात, ३० वर्षांवरील व्यक्तींचे व मधुमेह आणि रक्तदाबासाठी सर्वेक्षण केले जाते. ऑक्टोबर २०२४ पर्यंत ४ लाख २५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
जनजागृती उपक्रम
• आहार विषयक समुपदेशन सेवा सर्व दवाखान्यात सुरू असून त्यामध्ये ५५ हजारांपेक्षा अधिक मधुमेही व रक्तदाब रूग्णांना सल्ला देण्यात आला.
• गेल्या वर्षभरात विविध स्तरावर २५० आहार गट सत्र (डायट आणि जीवनशैली) महानगरपालिका विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आले.
• महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व इतर दवाखान्यांमध्ये एक लाखाहून अधिक रुग्ण मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता उपचार घेत आहेत.
याकडे लक्ष द्या..
• ३० वर्षांवरील मुंबईकरांनी रक्तांमधील साखर, रक्तदाब चाचणी करणे आवश्यक
• प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळावे, त्यावरील सूचना वाचावी
• दैनंदिन आहारात साखरेचा वापर कमी करावा
• मिठाचा कमी प्रमाणात वापर करावा
• नियमित व्यायाम, कमीत-कमी अर्धा तास चाला आणि योगा अभ्यास करा