राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे.
सातारा : राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे. आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातारा शहराच्या विकासामध्ये विशेष लक्ष आहे. विकास ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. आगामी काळात सातारा शहरातील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवू. सातारा शहराचा गतिमान विकास हेच आमचे लक्ष असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमोल मोहिते, प्रभाग क्र. ११ अ चे अधिकृत उमेदवार अविनाश कदम, प्रभाग क्र. ११ ब च्या अधिकृत उमेदवार सुजाता गिरीगोसावी, प्रभाग क्र. १२ ब च्या अधिकृत उमेदवार सौ. भारती शिंदे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांशी संवाद साधला. पदयात्रेला गारेचा गणपतीचे दर्शन घेऊन प्रारंभ झाला. पदयात्रा कारंडबी नाका, कृष्णेश्वर पार,गोखले हौद, मंगळवार तळे, शाहू बोर्डिंग, न्हावी आळी, धुमाळ आळी, सर्वोदय कॉलोनी, गडकर आळी, कुंभार आळी, बदामी विहीर, कोटेश्वर मंदिर ते सुरुची बंगला या मार्गावर काढण्यात आली. पदयात्रेत सर्व उमेदवार, प्रभाग क्र. १२ अ चे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार दिलीप म्हेत्रे यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागरिकांनी ठिकठिकाणी पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. ज्यांना सातारा शहराविषयी, सातारकरांविषयी काहीही देणेघेणे नाही अशा लोकांनी केवळ राजकीय विरोध म्हणून निवडणुकीत सहभाग घेतला आहे. आपण सर्वजण सातारकर आहोत आणि सातारकर म्हणून सातारा शहराचा सर्वांगीण विकास करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी, नवनवीन योजना राबवण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीने सर्वसमावेशक उमेदवार दिले असून त्यांना विक्रमी मतांनी निवडून देण्यासाठी सर्वांनी २ डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजवावा. विजय आपलाच आहे, त्यासाठी सातारकर म्हणून आपण सर्वांनी आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांना केले.