बुलंद सातारा : सर्व बातम्या एकाच ठिकाणी
बुलंद या शब्दाचा अर्थ अतिप्रचंड. पण पत्रकारितेच्या क्षेत्रात बुलंद या शब्दाचा गुणात्मक अर्थ घ्यायचा झाला तर सत्यावर अटळ राहणारा, सत्याची कास धरणारा... अठराव्या शतकात अटकेपर्यंत विस्तारलेल्या मराठा राज्याची राजधानी सातारा किल्ला उर्फ़ अजिंक्यतारा किल्ला होता.
बुलंद या शब्दाचा अर्थ अतिप्रचंड. पण पत्रकारितेच्या क्षेत्रात बुलंद या शब्दाचा गुणात्मक अर्थ घ्यायचा झाला तर सत्यावर अटळ राहणारा, सत्याची कास धरणारा... अठराव्या शतकात अटकेपर्यंत विस्तारलेल्या मराठा राज्याची राजधानी सातारा किल्ला उर्फ़ अजिंक्यतारा किल्ला होता. घाटमाथ्यावरील प्रतापगड, मकरंदगड, महिमानगड, वासोटा, जयगड हे निबिड अरण्यातील किल्ले शिवछत्रपतींनी स्वराज्यात सामील करून घेतल्यावर त्यांच्या एकाही शत्रुला ते परत जिंकून घेता आले नाहीत, हा सातार्याचा जाज्वल्य इतिहास आहे.
सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्हा हा संत महात्मे व योग्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. सप्तर्षिंपैकी एक वैदिक ऋषि व ब्रम्हदेवांचे मानसपुत्र महर्षि भृगु ह्यांचे तपःस्थान व समाधी मंदिर सातार्यात आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सज्जनगड, श्री गगनगिरी महाराज यांचे जन्मस्थान पाटण हे देखील सातार्यात आहे. राणी लक्ष्मीबाईंचे जन्मठिकाण सातार्यात आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या जिल्ह्याच्या बहुतांश गावांमध्ये युवक भारतीय सेने मध्ये भरती होण्याची परंपरा जपतात. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख या जिल्ह्याने निर्माण केली आहे.
सातारा जिल्हा हा नैसर्गिक साधनसंपत्ती, कृषी, शैक्षणिक, राजकीय परिपक्वता आदींनी बुलंद आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली व छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या प्रयत्नातून विकसित झालेली ही ऐतिहासिक नगरी मराठा साम्राज्याची चौथी राजधानी आहे. राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाज सुधारक महात्मा फुले, भारताच्या पहिल्या अध्यक्ष शिक्षिका सावित्रीबाई फुले, न्यायप्रिय राम शास्त्री प्रभुणे, रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, सेवा व वैराग्याचे प्रतीक असणारे सेवागिरी महाराज, इंग्रज सरकारला धडकी भरवणारे क्रांतिसिंह नाना पाटील अशा थोर व्यक्तींचा हा सातारा आहे. या राजधानी मध्ये पुरोगामी, विचारवंत, कलावंत, शिक्षण तज्ञ तसेच निर्भीड पत्रकार यांची एक मोठी परंपरा आहे. अशा या पवित्र भूमीत राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शैक्षणिक, तंत्रज्ञान, कृषी, गुन्हेगारी क्षेत्र या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या वस्तुनिष्ठ बातम्या दर्दी वाचकांना या ठिकाणी पाहायला मिळतील. वाचक हा खरा सुज्ञ असतो समाजातील विधायक आणि रचनात्मक बदल आपल्या संवेदनशील मनाने लगेच टिपतो. आजच्या पत्रकारितेची ती खरी मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणार्या पत्रकारितेने समाजातील वेगवेगळे बदल टिपून माध्यमाद्वारे समाजासमोर ठेवले पाहिजेत. पत्रकार हा समाजाचा जागता पहारा असतो. हाच जागता पहारा आणि त्याची व्रतस्थ भूमिका आजपासून बुलंद सातारा घेत आहे. समाजातील व्यंग, विसंगती, राजकीय हेवेदावे, बदल, नवीन राजकीय समीकरणे यावर आजपासून बुलंद सातारा मार्मिकपणे बोट ठेवताना दिसून येईल. समाजाच्या विविध पैलूंवर परखडपणे भाष्य करतानाच एखाद्याने केलेल्या स्तुत्य कार्यास शाबासकीची थाप देणारे हे न्यूज पोर्टल राहील. ‘सर्व बातम्या एकाच ठिकाणी’ या टॅग लाईन वर पोर्टलचा अधिकाधिक भर राहील. आपणा सर्व थोरामोठ्यांच्या आशीर्वाद, शुभेच्छा लाईक आणि सबस्क्राईब करून या पोर्टलला राहतील, हीच अपेक्षा आहे.
सदैव आपला,
विनित जवळकर
संपादक
बुलंद सातारा.