कुंडी आणि मातीचीही गरज नाही
कोथिंबीर रोजच्या आपल्या जेवणात असतेच. मग आपण भाजी केलेली असो, आमटी किंवा वरण असो.. नाहीतर एखादी उसळ, चटणी असो.. त्यांच्यावर जेव्हा कोथिंबीर भुरभुरून टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्हीही खुलून येतो.
कोथिंबीर रोजच्या आपल्या जेवणात असतेच. मग आपण भाजी केलेली असो, आमटी किंवा वरण असो.. नाहीतर एखादी उसळ, चटणी असो.. त्यांच्यावर जेव्हा कोथिंबीर भुरभुरून टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्हीही खुलून येतो. कोथिंबीरीशिवाय केलेली आमटी, भाजी अगदीच मिळमिळीत, साधी दिसायला लागते. त्यामुळेच रोज कोथिंबीर हमखास हवीच असते. म्हणूनच आता दरवेळी कोथिंबीरीची जुडी घेण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्याघरीच एका सोप्या पद्धतीने कोथिंबीर कशी उगवायची ते पाहा.. विशेष म्हणजे या पद्धतीने कोथिंबीर उगविण्यासाठी तुम्हाला मातीचीही गरज नाही फक्त एक काचेचे मोठे भांडे तुमच्याकडे असले तरी पुरेसे आहे
घरच्याघरी कोथिंबीर कशी उगवायची?
कोथिंबिरीच्या टाकाऊ काड्या घेऊन माती न वापरताही त्यापासून घरच्याघरी कोथिंबीर कशी उगवायची याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ maplemomchronicles या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा प्रयोग करण्यासाठी कोथिंबीरीच्या अशा काड्या घ्या ज्या काड्यांच्या अगदी खालच्या भागात मुळं असतात. त्याच काड्या तुम्हाला हा प्रयोग करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
त्या काड्यांना असणारी पानं काढून घ्या आणि त्या थोड्या कापून घ्या. आता एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये कोथिंबीरीच्या मुळांसकट असणाऱ्या काड्या बुडवून ठेवा.
हे भांडं जिथे स्वच्छ सुर्यप्रकाश येत असेल अशा खिडकीत ठेवावं. कारण त्याला थोड्याफार प्रमाणात थेट सुर्यप्रकाशाची गरज असते.
या भांड्यातलं पाणी दररोज बदला. पाणी बदललं नाही तर त्या पाण्याला कुबट वास येऊ शकतो आणि शिवाय कोथिंबीरीची वाढही चांगली होत नाही. साधारण २ ते ३ दिवसांतच तुम्हाला त्याला नवी पानं फुटलेली दिसतील. त्यानंतर पुढच्या ८ ते १० दिवसात भरपूर पानं येतील. ती पानं कापून घ्या आणि पुन्हा हाच प्रयोग करण्यासाठी बाकीची मुळं ठेवून द्या. चकटफू कोथिंबीर मिळवून देणारा हा उपाय एकदा करून पाहायला हरकत नाही.