कर्नल संतोष महाडिक यांचे बलिदान युवा पिढीला प्रेरणा देणारे
कर्नल संतोष महाडिक यांनी प्राणपणाने लढा देऊन देशासाठी बलिदान केले. त्यांचे नेतृत्व गुण आणि धडाडी ही आजच्या युवा पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. या बलिदानाचा कधीही विसर पडणार नाही, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा : कर्नल संतोष महाडिक यांनी प्राणपणाने लढा देऊन देशासाठी बलिदान केले. त्यांचे नेतृत्व गुण आणि धडाडी ही आजच्या युवा पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. या बलिदानाचा कधीही विसर पडणार नाही, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
हुतात्मा उद्यान परिसरातील कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतिदिन निमित्त नव्याने बांधण्यात आलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम सातारा जिल्हा माजी नौसैनिक संघटनेने आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संतोष महाडिक यांच्या मातोश्री कालिंदी घोरपडे, माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष कॅप्टन उदाजीराव निकम, नौसैनिक संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत पडवळ, राजेंद्र शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अशपाक पटेल, एसबी चव्हाण, सुवर्णाताई पाटील, सीता हादगे, निर्मला पाटील, प्रभावती महाडिक, राम हादगे, श्रीकांत आंबेकर, चेतन सोळंकी, राजू राजपूत, बाबासाहेब हराळे, रवींद्र महाडिक, वैभव पोद्दार, इत्यादी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, "सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे. या भूमीला बलिदानाची आणि असीम धाडसाची परंपरा आहे. कर्नल संतोष महाडिक यांनी हीच परंपरा अत्यंत प्रखरतेने चालू ठेवली होती. आपल्या जिल्ह्याने देशासाठी हजारो सैनिक दिले आहेत. शहीद कर्नल महाडिक यांचे शौर्य अतुलनीय असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांचे बलिदान आजच्या युवा पिढीला आणि सर्व नागरिकांना देशप्रेमाची प्रेरणा देत राहील. शहीद स्मारक परिसरामध्ये दिवसभर नागरिकांची अभिवादनासाठी गर्दी होती.