महायुती तसेच महाविकास आघाडीतील बंडखोरांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र सादर
विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) अर्ज भरणाच्या शेवटच्या दिवशी महायुती तसेच महाविकास आघाडीतील बंडखोरांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र सादर केले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे पेच निर्माण झाला असून, प्रमुख उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) अर्ज भरणाच्या शेवटच्या दिवशी महायुती तसेच महाविकास आघाडीतील बंडखोरांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र सादर केले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे पेच निर्माण झाला असून, प्रमुख उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.
राज्यात सध्या चर्चेत असलेल्या नांदगावमध्ये अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे मतदारसंघात तुल्यबळ लढत रंगणार आहे.
नाशिक मध्य मतदारसंघात अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, काँग्रेसचे हनीफ बशीर, गुलजार कोकणी यांनी नामनिर्देशनपत्र भरले. त्यामुळे युती व आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. नाशिक पश्चिममध्ये दिनकर पाटील हे ऐनवेळी मनसेच्या इंजिनात बसल्याने भाजपला धक्का बसला. या धक्क्यातून सावरत असताना माजी नगरसेवक शशिकांत जाधव व दिलीप भामरे यांनीही अर्ज भरल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. नाशिक पूर्वत चौरंगी लढतीची शक्यता आहे.
देवळाली मतदारसंघात शिवसेनेने डॉ. राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिल्याने अजित पवार गट अडचणीत आला आहे. तर इगतपुरीत माजी आमदार निर्मला गावित यांनी अपक्ष अर्ज भरल्याने काँग्रेसचे लकी जाधव यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. मालेगाव बाह्यमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय बंडू बच्छाव अपक्ष रिंगणात उतरले आहेत. येवल्यात मंत्री छगन भुजबळ विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांच्यात प्रमुख लढत होईल, अशी अटकळ होती. मात्र, येथून ठाकरे गटाचे कुणाल दराडे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने आघाडीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
चांदवडमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्याविरोधात त्यांचे चुलत बंधू केदा आहेर तसेच जिल्हा परिषदेचे पक्षाचे माजी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत भर पडली आहे. दिंडोरीत शिवसेनेने शेवटच्या क्षणी धनराज महालेंना एबी फॉर्म दिल्याने अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांच्यापुढे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, सिन्नर, निफाड, बागलाण व कळवण मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगणार आहे.