आता सातारा जिल्हा झाला कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा
गेल्या 58 वर्षाच्या इतिहासात सातारा जिल्ह्याच्या यशवंत भूमीला तब्बल पाच कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत.
सातारा : गेल्या 58 वर्षाच्या इतिहासात सातारा जिल्ह्याच्या यशवंत भूमीला तब्बल पाच कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे व आमदार मकरंद पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी दिशा वेगळीच असणार आहे. राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट व भाजप या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने महायुतीने सातारा जिल्ह्यात राजकीय समतोल साधल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणाने गेल्या सहा दशकामध्ये मंत्रिमंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकीय संधी अनुभवली नव्हती. सातारा जिल्हा हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या यशवंत विचारांचा जिल्हा मानला जातो. सुरुवातीला कॉंग्रेसचा आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्या सातारा जिल्ह्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने आपली घट्ट पकड बसवली आहे. ही राजकीय पकड आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत पश्चिम महाराष्ट्रातील 10 कॅबिनेट मंत्री पदापैकी सातारा जिल्ह्याला महायुतीने पाच कॅबिनेट मंत्री पदे दिली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील व आमदार जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे आणि देसाई वगळता जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे आणि मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी प्रथमच संधी मिळत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला आगामी पाच वर्षांमध्ये मोठी गती मिळणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
सातारा जिल्हा हा तसा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण राजकीय इतिहासाचा धांडोळा घेतला तर गेल्या 58 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मंत्रिपदे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीच्या सातारा येथील कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि त्यांच्या सहकार्यांनी एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आमदार जयकुमार गोरे यांना माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने ताकद देण्यात आली आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दाखवलेली पक्षनिष्ठा तसेच राजकीय वर्चस्व, भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमांचा केलेल्या प्रचार याची दखल घेऊन शिवेंद्रसिंहराजे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाने सुद्धा सातारा जिल्ह्यात आपली पक्की मांड बसवण्याच्या दृष्टीने शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदी संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपण शब्दाचे पक्के आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून देत कॅबिनेट मंत्रीपदी आमदार मकरंद पाटील यांना संधी दिली आहे. सातारा जिल्ह्यात पाच कॅबिनेट मंत्री पदे आल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
*33 कॅबिनेट मंत्र्यांसह 6 राज्यमंत्र्यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ*
आज नागपूर येथील राजभवन येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात 33 कॅबिनेट मंत्री यामध्ये -
चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, शंभूराज देसाई, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर यांचा समावेश होता.
तर राज्यमंत्र्यांमध्ये माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांचा समावेश होता.
सातारा जिल्ह्यातील सतराव्या क्रमांकावर शंभूराज देसाई, 21 व्या क्रमांकावर शिवेंद्रसिंहराजे भोसले, 23व्या क्रमांकावर जयकुमार गोरे आणि 29 व्या क्रमांकावर मकरंद पाटील यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.