श्रीकृष्ण जन्माष्टमी सातारा जिल्ह्यात उत्साहात साजरी
संततधार जोरदार पावसामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी सातारा जिल्ह्यात संपन्न झाला.
सातारा : संततधार जोरदार पावसामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी सातारा जिल्ह्यात संपन्न झाला.
यावर्षी आलेल्या तिसरा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी चे औचित्य राखून अनेक कृष्ण भक्तांनी तसेच शिवभक्तांनी उपवासाचे व्रत केले. सोमवारी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या जन्माचे कथन करत भगवान गोपाल कृष्ण की जय राधे राधे जय श्री कृष्ण....अशा मोठ्या घोषणा देत हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा शेकडो कृष्ण भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
दरम्यान सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिरा नजीकच्या श्री दिवशीकर बंधूंच्या श्री मुरलीधर मंदिरात या जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी श्री रामकृष्ण सेवा मंडळाचे भक्तांनी श्री शाम नाम संकीर्तन तसेच कृष्ण पदांचे गायन केले. तत्पूर्वी सायंकाळी शंकराचार्य मठातील वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी व त्यांच्या अकरा ब्रह्मावृंदांनी मंत्र जागर पठण केले.
सोमवारी सकाळी जन्माष्टमी निमित्त वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनपर पौरोहित्याखाली दिवशीकर परिवारातील बाळासाहेब ऊर्फ श्रीकांत दिवशीकर, सुनित दिवशीकर, संदीप दिवशीकर, स्वानंद दिवशीकर, सुमेध दिवशीकर तसेच दिवशीकर परिवारातील सदस्यांच्या हस्ते विधिवत श्रीकृष्णाची महापूजा करण्यात आली.
यावेळी पवमान पंचसूक्तचा अभिषेक करण्यात आला . मंदिरातील भव्य अशा संगमरवरी मूर्तीला आकर्षक भरजरी पोशाख घालण्यात आला होता. तसेच सुवासिक चाफा, गुलाब, शेवंती, मोगरा, निशिगंध आदी फुलांचे हार आणि विशेष करून देवाला आवडणारी तुळस मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आली होती.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध रंगातील पडदे व फुलांच्या माळांनी भक्तांचे लक्ष वेधून घेतले जात होते . मंदिराच्या प्रांगणात काढलेली माखन चोर बालकृष्णाची विविध रंगातील देखणी रांगोळी ही तितकीच लक्ष वेधून घेणारी ठरत होती. दिवसभर श्रीकृष्ण भजने, भावगीते, भक्ती गीते तसेच नामवंत गायकांनी गायलेल्या गीतांचा यावेळी परिसरात सुरू असलेला नामघोष वातावरणात अधिकच धार्मिकतेचे रूप आणत होता .सकाळपासूनच या मंदिरात सातारा शहर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
रात्री 11 वाजता वेदमूर्ती माधवशास्त्री भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाचे मूर्तीला विष्णुसहस्त्रनाम म्हणत तुलसी दल अर्पण करण्यात आले. त्यानंतर रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची जन्मकथा वर्णन करत. भगवान गोपाल कृष्ण की जय, मुरलीधर की जय, जय श्रीकृष्ण.. असा मोठ्या आवाजात घोषणा देत उपस्थित कृष्ण भक्तांनी हा जन्मोत्सव साजरा केला. त्यानंतर रात्री विविध मिठाई, खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. सर्वांना सुंठवडा तसेच प्रसादाचे वितरण करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी दहीहंडी फोडून काल्याचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सातारा शहरातील मेढा रस्त्यावरील हमदाबाज येथील इस्कॉन संघाचे वतीने ही मंदिरात जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
करंजे परिसरातील श्री महानुभाव मठात भव्य श्रीकृष्ण मूर्तीला अतिशय सुरेख सजवण्यात आले होते. कृष्णानगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिरातही हा जन्मोत्सव वेदमूर्तींच्या मंत्रजागर तसेच विविध श्रीकृष्ण स्तोत्रांच्या पठणाने उत्साहात संपन्न झाला. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील श्रीक्षेत्र गिरवी येथील देशपांडे व परिवाराच्या गोपाल कृष्ण मंदिरातही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हरी-हराचे प्रतिक असलेली ही काळ्या पाषाणातील भव्य कृष्णमूर्ती विशेष लक्षवेधक आणि भक्तांच्या पसंतीस ठरलेली आहे. या मंदिरामध्ये या जन्मोत्सवानिमित्त विष्णुसहस्रनाम पठण तसेच गीता पठण करण्यात आले. अशी माहिती मंदिराचे मुख्य मालक जयंत देशपांडे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे समाधी स्थळी असलेल्या मंदिरातील श्रीकृष्ण मंदिरातही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मंदिरात भक्तांनी बनवलेली आकर्षक बालकृष्ण लीला आणि गोवर्धनचे वर्णन असलेला देखावा लक्षवेधून घेणार होता. अनेक मंदिरांमध्ये रात्री उशिरा बारा वाजता मध्यरात्रीला श्रीकृष्ण जन्मोत्सव होऊन भक्तांनी भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा जयघोष केला.