महिला बालविकास विभागाची ६५३ जणांना लॉटरी
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील महिला व बालविकास विभागांच्या चार योजनांसाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यामध्ये एकूण ६५३ महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पिठाची गिरण, सायकलसह पिकोफॉल मशीन आणि संगणक प्रशिक्षण योजनेचा समावेश आहे.
सातारा : जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील महिला व बालविकास विभागांच्या चार योजनांसाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यामध्ये एकूण ६५३ महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पिठाची गिरण, सायकलसह पिकोफॉल मशीन आणि संगणक प्रशिक्षण योजनेचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून विविध विभागांसाठी अनुदानावर योजना राबविण्यात येतात. तसेच महिला व बालविकास विभागाकडूनही काही योजनांसाठी अनुदान दिले जाते. मंगळवारी महिला व बालविकासच्या चार योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली ही लाभार्थी निवड झाली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरण देण्यात येते. यासाठी एकूण १११ महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सातारा तालुक्यातील १७, वाई ८, जावळी आणि खंडाळा प्रत्येकी ५, फलटण १२, खटाव तालुका १०, माण आणि कोरेगाव प्रत्येकी ९, कराड २१, पाटण १२ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ३ लाभार्थ्यांची निवड झाली. ग्रामीण महिलांना पिकोफॉल मशीन देणे योजनेसाठी ९५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लेडिज सायकलसाठी २२६ महिला लाभार्थ्यांची निवड झाली. यामध्ये सातारा तालुक्यातील ३३, वाई १३, जावळी ४, खंडाळा ९, फलटण तालुका २०, खटाव १२, माण २२, कोरेगाव ५, कऱ्हाड तालुका ७३, पाटण २५ आणि महाबळेश्वर तालुक्यातील १० लाभार्थ्यांची निवड झाली. ग्रामीण भागातील महिलांना संगणक प्रशिक्षणासाठी योजना राबविण्यात येते. याअंतर्गत २२१ लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
या सर्व योजनांसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार आहे. संबंधितांच्या बँक खात्यावर थेट अनुदान जमा होणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.