समर्थनगर ग्रामस्थांच्या आरोग्य प्रश्नी आ. महेश शिंदे यांची निर्णायक कार्यवाही
सातारा शहरानजिकच्या देगाव फाटा येथे सांडपाण्याचे गटर तुंबल्यामुळे हे सांडपाणी रस्त्यावर येत होते. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
सातारा : सातारा शहरानजिकच्या देगाव फाटा येथे सांडपाण्याचे गटर तुंबल्यामुळे हे सांडपाणी रस्त्यावर येत होते. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आमदार महेश शिंदे यांनी तात्काळ तोडगा काढत हे काम स्वखर्चाने करण्याचा मानस बांधला आहे. त्यानुसार कामाची सुरुवात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील देगांव फाटा येथील मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी साठून दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीस सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला होता. या समस्येबाबत ग्रामस्थांनी उपसरपंच सौ. संगिता माने, ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया मोरे, विद्या हिरेमठ, शुभांगी डोर्ले, संजय भोसले या सदस्यांचे लक्ष वेधले होते. या सदस्यांनी आ. महेश शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ग्रामस्थांच्या आरोग्य विषयक समस्येचे निराकरण करण्यासाठी स्वखर्चाने येथील गटाराच्या कामास प्रारंभ करून दिला आहे. त्या अनुषंगाने आ. महेश शिंदे यांनी सर्व लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्शच घालून दिला आहे.
समर्थनगर येथील पाच ते सहा काॅलन्यांचे पाणी मोठ्या गटारातून देगांवफाटा येथील ओढ्यात सोडले जाते. मात्र या गटारातच घनकचरा अडकल्यामूळे हे गटार मागील काही महिन्यांपासून तुंबले आहे. त्यामूळे गटारातील पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे. तसेच रस्त्यासमोरील भंडारी हाईटसच्या प्रांगणातही पाणी साठून राहत आहे. त्यामूळे या परिसरात दलदल माजली असून, परिसरात दूर्गंधी पसरली होती. ज्या परिसरातून हे सांडपाणी वाहत आहे, तेथून अवघ्या दहा फुटांवर मिठाईची दुकाने, मेडिकल, सुपर मार्केट, हाॅस्पिटल व नागरी वस्ती असून याच रस्त्याने देगांव ते सातारा शहर व एम.आय.डी.सी.ला जाणारी वाहतूक होते. त्यामूळे या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. दुर्गंधी व दलदलीमूळे रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या प्रश्नाची येथील जागरूक ग्रामपंचायत सदस्यांनी दखल घेऊन, कर्तव्यदक्ष-लोकहितवादी आमदार महेश शिंदे यांना या प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. ही बाब समजून घेताच आमदार महेश शिंदे यांनी कोणत्याही प्रशासकीय सोपस्कारांची वाट न पाहता या ज्वलंत प्रश्नाची कायमस्वरूपी उकल करण्यासाठी स्वखर्चाने गटाराच्या कामास प्रारंभ केला.
आ. महेश शिंदे यांच्या या दातृत्वाबाबत तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या जागरुकतेबाबत सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आ. महेश शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्यांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
आ. महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून काम मार्गी
स्थानिक नागरिकांच्या व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन देगांव फाट्यावरील रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न आ.महेश शिंदे यांनी मार्गी लावला आहे. लगोलग जेसीबीच्या सहाय्याने हे काम ग्रामपंचायत प्रशासनामार्फत हाती घेण्यात आले आहे. समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील देगांव फाटा येथे गटाराचे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामूळे परिसरात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. याबाबत नागरिकांनी ही बाब सदस्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या सांडपाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी स्वखर्चातून हे काम करण्याचे ठरवून याबाबत कायमचा तोडगा काढला आहे. या अनुषंगाने गटाराचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
समर्थ नगर आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या या प्रश्नाबाबत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संगिता माने, ग्रामपंचायत सदस्या शुभांगी डोर्ले, विद्या हिरेमठ, सुप्रिया मोरे, संजय भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता.