जकातवाडी रेशन दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी
जकातवाडी, सातारा येथील रेशन दुकानदार रघुनाथ माने यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या जकातवाडीतील ग्रामस्थांनी माने यांच्यासह त्यांच्या दुकानावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सातारा : जकातवाडी, सातारा येथील रेशन दुकानदार रघुनाथ माने यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या जकातवाडीतील ग्रामस्थांनी माने यांच्यासह त्यांच्या दुकानावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास जकातवाडीतील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जकातवाडी, ता. सातारा येथे रघुनाथ माने यांचे बोगदा परिसरात रेशन दुकान आहे. या दुकानातून जकातवाडीतील लाभार्थ्यांना रेशनचे वितरण होत असते. माने यांच्या दुकानात बाकीचे जिन्नसही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. माने यांचे रेशन दुकाना व्यतिरिक्त वेगळे किराणा मालाचे दुकानही आहे. त्याचबरोबर एक ढाबाही या महाशयांचा आहे. दरम्यान, त्यांच्या सुनबाई या ग्रामपंचायत पदाधिकारीही आहेत. माने यांच्या रेशन दुकानात तक्रार नोंदवही नसते. रेशनची आवक आणि जावक लिहिलेला फलक तर येथील लाभार्थ्यांच्या दृष्टोत्पत्तीसच पडलेला नाही. पॉस मशिन जे प्रत्येक रेशन दुकानदाराने आपल्या रेशन दुकानात ठेवणे नियमाने गरजेचे असताना माने यांच्या दुकानाचे पॉस मशिन हे त्यांच्या किराणा दुकानात असते. ज्या मशिनची प्रत्येक लाभार्थ्यासाठी गरज असताना ते मशिन किराणा दुकानात कशासाठी? या व अशा बर्याच घटनांमधून माने हे शासन नियमांची धडधडीत पायमल्ली करताना दिसत आहेत. तसेच यातून धान्याचा काळाबाजार होत असल्याचाही जकातवाडी ग्रामस्थांचा आरोप आहे.
खरेतर जकातवाडी दक्षता समितीने याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या भावनेतून कदाचित तो पाठवला गेला नसेल. मात्र, जकातवाडीतील नरेंद्र विजय यादव या युवकाने याविरोधात एल्गार पुकारलेला आहे. त्याने माने यांच्याकडून लाभार्थ्यांना होत असल्याची व्हिडिओ क्लिपच काढली आहे. लाभार्थ्यांशी अगदी मग्रुरीने आणि आपण त्यांच्यावर उपकार करीत आहोत, अशा अविर्भावातून होत असलेले बोलणे, रेशन दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले अन्य जिन्नस यामाध्यमातून नरेंद्र यादव या तरुणाने माने यांच्या रेशन दुकानाची पोलखोल केली आहे. एवढ्यावरच न थांबता नरेंद्र यादव यांनी माने यांच्यावर कारवाई होण्याबाबत जिल्हाधिकारी, तहसिलदार, अन्न पुरवठा कार्यालयांमध्ये निवेदनेही दिली आहेत. अशारीतीने जकातवाडी ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात नरेंद्र यादव याने लढाच उभा केला आहे, असे म्हणावे लागेल.
माने यांचे हे दुकान गावात नसल्याने लाभार्थ्यांना पदरमोड करुन बोगदा परिसरात असलेल्या त्यांच्या दुकानातून रेशन आणून आपल्या परिवाराच्या पोटाचा प्रश्न सोडवावा लागत आहे. जकातवाडी गावातील वयोवृद्ध तर हे दिव्य कसे पार करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी.
याबाबत बोलताना नरेंद्र यादव म्हणाले, माने यांच्याकडून जकातवाडी ग्रामस्थांना मंजूर आणि वितरीत होणार्या कुठेच पायपोस नाही. याबाबत मी माने यांच्या रेशन दुकानाविरोधात विविध ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार माने यांच्या दुकानाची सखोल चौकशी होवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर माने यांची कायदेशीररित्या वस्तुनिष्ठ चौकशी झाली नाही तर जकातवाडीतील मी आणि काही तरुण आत्महन करणार आहोत. या आत्मदहनामध्ये आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन आणि रघुनाथ माने हेच जबाबदार राहतील. शासनाने अंत्योदय योजनेतून लाभार्थ्यांच्या धान्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे जकातवाडीतीलच एखाद्या पात्र उमेदवारास जकातवाडीमध्येच रेशन दुकान देण्यात यावे, अशीही मागणी यादव यांनी केली आहे.
विठूराया, मानेंना सुबुद्धी दे !
अंत्योदय योजनेचे लाभार्थी हे निश्चितच गरीब असताना आणि त्यांना युनिटप्रमाणे धान्य मंजूर असताना माने हे तुटपूंजे धान्य देवून लाभार्थींची बोळवण करीत आहेत. या तुटपूंज्या धान्यावर त्या परिवाराने महिनाभर कशी गुजराण करायची, हा खरा प्रश्न आहे. मात्र, त्याच्याशी काहीही देणेघेणे माने यांना नसते. ते फक्त आपल्याच लाभाचा विचार करताना दिसत आहेत. मात्र, गरीबांच्या तोंडचा घास हिरावून माने हे खर्या अर्थाने गरीबांचा देव असलेल्या विठूरायाकडे गेले असल्याचे समजत आहे. असे असले तरी गरीबांना नाडवणार्या मानेंना ती गरींबाची विठूमाऊली कसा आशिर्वाद देईल? यावेळी पुरवठा निरीक्षक अतुल जीवने, तलाठी जय बर्गे, जकातवाडीच्या सरपंच अश्विनी दळवी, ग्रामसेवक गोकुळदास उदागे हेही उपस्थित होते.