पुण्याहवाचन आणि 50 सप्तशती पाठांनी शतचंडी यागाला उत्साहात प्रारंभ
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त येथील श्री समर्थ सदन मध्ये आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर झाला.
सातारा : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त येथील श्री समर्थ सदन मध्ये आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर झाला. प्रारंभी वेदमूर्ती, सर्व ब्रह्मवृंद, समर्थ सदनचे व्यवस्थापक, ज्येष्ठ रामदासी व मान्यवर यजमान व समर्थ भक्तांच्या उपस्थितीत समर्थ प्रतिमा पुढे दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतरवेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याहवाचन तसेच गणेश पूजन आणि सप्तशती पाठाने याग सोहळ्याचा प्रारंभ झाला. प्रायश्चित्त, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन होऊन सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत उत्सव मूर्ती प्रतिष्ठापना तसेच देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन केले.
या शतचंडी याग सोहळ्यानिमित्त समर्थ सदनमध्ये आकर्षक गजांत लक्ष्मी आणि फुलांच्या सजावटीमध्ये सुबक अशा श्री महालक्ष्मी देवीची बैठी सुरेख मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच नवग्रह आणि इतर देवतांची स्थापना ही या मंचावर करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचे यजमानपद समर्थ सेवा मंडळाचे कार्यकर्ते हरिभाऊ देशपांडे व त्यांच्या पत्नी सौ. विजया देशपांडे या करत आहेत.
वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांचे समावेत प्रसाद शास्त्री लिमये आणि एकूण 15 ब्रह्मवृंद या याग सोहळ्यात वैदिक कार्यक्रम पार पाडत आहेत. सज्जनगड येथून श्री समर्थ सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मंडळाचे खजिनदार अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी, श्रीमती विद्याताई पुरोहित, दिनेशबुवा वैद्य रामदासी यांचेसह रमेश बुवा शेंबेकर सातारा येथील समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, शरद बुवा जठार, सौ. कल्पना ताडे, अनघाताई देसाई, संतोष वाघ, सुनील कुलकर्णी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, अनिल प्रभुणे आदी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
बुधवारी या शतचंडी सोहळ्यात सकाळी उर्वरित सप्तशती पोथीचे पन्नास पाठ ब्रह्मवृंद म्हणणार असून याचवेळी गो पूजन ,कुमारीका पूजन, गणपती पूजन संपन्न होणार आहे. सायंकाळी नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीपबुवा मांडके यांचे श्रीदेवी महात्म यावर सुश्राव्य किर्तन बुधवारी सायंकाळी संपन्न होणार आहे, अशी माहिती प्रवीण कुलकर्णी गुरुजी यांनी दिली. या सोहळ्यास सातारकरांनी तीन दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच यासाठी तन,मन आणि धन अर्पून हा आनंद लुटावा असे आवाहनही समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.