कोरेगावात विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका युवकाने विद्यमान आ. महेश शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, पुसेगाव पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केल्याने या युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका युवकाने विद्यमान आ. महेश शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, पुसेगाव पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केल्याने या युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या पक्षपाती मुजोर पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत, संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून, एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आले आहे. अशातच ओंकार बाबासो शिंदे (वय.२१) रा. डिस्कळ ता. खटाव येथील युवकाने कोरेगाव मतदारसंघाचे विद्यमान आ. महेश शिंदे यांचा एका कार्यक्रमादरम्यान डान्स करतानाच्या व्हिडिओचे व्हाट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यामुळे दि.५ रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान, पुसेगाव पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी सबंधितास बोलावून घेत, तू हा स्टेटस का ठेवला? असा प्रश्न विचारत संबंधित युवकास अर्वाच भाषेत शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत संबंधित युवकाचा हात मोडला. संबंधित युवकांनी यासंदर्भात कोणाची तक्रार आहे का? असा प्रश्न केला मात्र पोलिसांनी काही एक न सांगता मारहाण सुरूच ठेवली. यानंतर पोलिसांनी संबंधित युवकाचा मोबाईल पोलिसांनी जमा केला. मोबाईल जमा केल्याचा पंचनामा अथवा यासंदर्भात कोणतेही कागदपत्र संबंधित युवकाला दिले नाही. यानंतर मारहाण झालेल्या ओंकार शिंदे यांनी याबाबतची लिखित तक्रार सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, झालेल्या घटनेचे निषेधार्थ आज दि. ६ रोजी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांना कायदा हातात घेऊन, निष्पाप युवकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) चे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पुसेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्याआंदोलन करीत सपोनि. पोमन यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आ. शिंदे यांनी केली.