रिझर्व्ह बॅंकेकडून सहकारी बॅंकांवर चुकीचे निर्बंध
राज्यातील पाचशे पेक्षा जास्त सहकारी बॅंका बंद झाल्या असून या अडचणीच्या काळातही पगारदार नोकरांची अग्रणी बॅंक असलेल्या प्राथमिक शिक्षक बॅंकेची दमदार वाटचाल आहे. या बॅंकेचे कार्य निश्चितच सहकारी बॅंकासाठी प्रेरणादायी असा आहे.
सातारा : राज्यातील पाचशे पेक्षा जास्त सहकारी बॅंका बंद झाल्या असून या अडचणीच्या काळातही पगारदार नोकरांची अग्रणी बॅंक असलेल्या प्राथमिक शिक्षक बॅंकेची दमदार वाटचाल आहे. या बॅंकेचे कार्य निश्चितच सहकारी बॅंकासाठी प्रेरणादायी असा आहे. अडचणीत सापडलेल्या बॅंकांना आधार देण्याएवजी त्यांच्यावर वेगवेगळे निर्बंध रिझर्व्ह बॅंकेकडून लावण्यात येत असून हे सहकारासाठी धोकादायक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले .
प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या शतक महोत्सवी समारंभात खा. शरद पवार बोलत होते. यावेळी खा. धैर्यशील मोहिते - पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. जयंत आसगावकर, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, बॅंकेचे चेअरमन किरण यादव, व्हा. चेअरमन शहाजी खाडे, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजयराव कोंबे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, अखिल शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस दीपक भुजबळ, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, अखिल सातारा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, सातारा जिल्हा नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल देसाई, अभय जगताप, डॉ. अरुणा बर्गे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक आदी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, देशात दोन ते तीन राज्यांनी सहकारात उठावदार कामगिरी करत आपले वेगळेपण निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्य तर सहकारात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मात्र सध्या सहकारात अडचणीत आणण्याचे उद्योग होत आहेत. अडचणीतील संस्थांना आधार देण्याएवजी त्यांना निर्बंध लादून आणखी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील पाचशेहून अधिक बॅंका बंद पडल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लावावेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही मात्र ज्या बॅंका पुन्हा स्थिरस्थावर होवू शकतात त्यांना सहकार्यही केले पाहिजे. सातारची प्राथमिक शिक्षक बॅंक ही नावाजलेली बॅंक असून कर्ज वितरण, कर्ज वसुली यामध्ये बॅंक अग्रेसर आहे. शिक्षकांची आधारवड बनत सभासदांच्या पाल्यांनाही शिक्षणासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देवून बॅंकेने भावी पिढी घडवण्याचेच काम चालवले आहे.
खा. धैर्यशील मोहिते - पाटील म्हणाले, शिक्षकांना आर्थिक उंची देण्याचे काम शिक्षक बॅंकेकडून होत असून बॅंक शिक्षकांसाठी विविध योजना राबवत आहे. सहकारात दिवसेंदिवस अडचणी वाढत असतानाही पगारदार नोकरांच्या बॅंकेत शिक्षक बॅंक अग्रणी असून बॅंकेचा शतकी महोत्सव साजरा होणे ही बाबही निश्चितच समाधानकारक आहे. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. शरद पवार यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. आज शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र सध्या शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावून वेठीस धरण्याचे काम होत आहे. महाविकास आघाडी सरकार कार्यरत असताना काही प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत. सध्याच्या सरकारने मात्र शिक्षकांचा फक्त मतासाठी वापर केला आहे. जुनी पेन्शन योजना लागू न करता दुसऱ्या योजना लादण्याचा सरकारचा डाव आहे.
संभाजीराव थोरात म्हणाले, केंद्रातील सहकार खात्याने अध्यादेश काढून सेवानिवृत्तांचा सभासद होण्याचा अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जे सेवानिवृत्त सभासद आहेत त्यांची कर्ज वसुली होण्यात अडचणी येणार आहेत. पवार साहेब दिल्लीत तुमच्या शब्दाला वजन असून याप्रश्नी आपण आवाज उठवावा.
उदय शिंदे म्हणाले, गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून शरद पवारांचा शिक्षक बॅंकेशी ऋणानुबंध आहे. त्यांनी शिक्षकांना केंद्राप्रमाणे तरतुदी लागू केल्याने आज शिक्षकांची आर्थिक प्रगती होताना दिसत आहे. २००५ नंतर नोकरीत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, २० पटाच्या आतील शाळा बंद करु नयेत, शिक्षण सेवक पद रद्द करावे आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या. आ. जयंत आसगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
किरण यादव म्हणाले, दि. २१ ऑक्टोबर १९२४ रोजी स्थापन झालेली प्राथमिक शिक्षक बँक १०० वर्षे पूर्ण करत असल्याचा निश्चितच अभिमान आहे. बॅंकेच्या नावलाैकिकासाठी अनेकांनी दिलेले योगदान न विसरणारे आहे. पगारदार नोकरांच्या बॅंकेत ही बॅंक अग्रणी असून बॅंकेने नेहमीच सभासदाभिमुख कार्यभार केला आहे. बॅंकेने सभासदाभिमुख व पारदर्शक कारभार केल्याने राज्यात नावलाैकिक मिळवला आहे. आज गुगल पे व फोन पे चा शुभारंभ होत असल्याचे समाधान आहे. बॅंकेने नेहमीच सर्वांना विश्वासात घेवून कारभार केल्याने बॅंक प्रगतीपथावर आहे. यावेळी श्री. यादव यांनी बॅंकेच्या शंभर वर्षाच्या कार्याचा आढावा सादर केला.
या कार्यक्रमानिमित्त बँकेच्या १०० वर्षाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘शतार्थ’या स्मरणिकेचे प्रकाशन, एटीएम कार्ड, डीजीटल बॅंकिंग युपीआय कार्डचे वितरण, अकरा ज्येष्ठ सभासद व बॅंकेच्या सर्व माजी चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे लिखित प्रभातरंग या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बॅंकेचे संस्थापक कृ. बा. बाबर यांचे नातू यशवर्धन पवार (चितळी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी समितीचे नेते शंकर देवरे, बॅंकेचे संचालक ज्ञानबा ढापरे,नितीन काळे, पुष्पलता बोबडे,निशा मुळीक, महेंद्र जानुगडे,विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे या संचालकासह मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कदम, विजय पवार उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, बॅंकेचे सभासद, हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बॅंकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन शहाजी खाडे यांनी आभार मानले.