मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवर येणार बंदी
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाची पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे.
मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाची पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. हवेची खराब झालेली गुणवत्ता पाहता मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याबाबात चर्चा करण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी घालण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ७ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
मुंबईत हवेचा स्तर सर्वाधिक खराब स्थितीत आहे. यासाठी सतत सुरू असलेली बांधकामं, बेकरी, वाहनांमुळे होणारं प्रदूषण अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी २२ जानेवारी रोजी जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार निवृत्त आयएएस अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संदर्भात अभ्यास करेल आणि तीन महिन्यांत आपल्या शिफारशींसह अहवाल सादर करेल.
मुंबई उच्च न्यायालयाने ९ जानेवारी रोजी जनहित याचिकेवर सुनावणी केली होती. यावेळी सुनावणीत, मुंबईतील वाढती वाहतूक आणि वाढत्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती. वाहनांमधून होणारं प्रदूषण हे वायू प्रदूषणाचं प्रमुख स्त्रोत असल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं. मुंबईतील वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सध्याच्या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचंही उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.