पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठ्लाची सपत्नीक महापूजा
विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्लच्या गजरात अवधा महाराष्ट्र आज पंढरपुरात दाखल झाला आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापुजा संपन्न झाली.
पंढरपुर : विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्लच्या गजरात अवधा महाराष्ट्र आज पंढरपुरात दाखल झाला आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. यावेळी नाशिकमधील उगले दामपत्याला महापुजेचा मान मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ही महापूजा पार पडली. रुक्मिणी मातेला दुधाचा अभिषेक मुख्यमंत्री फडणवीस आणि मान मिळालेल्या उगले दामपत्यांनी यांनी घातला. त्यानंतर उगले दामपत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि सत्कार देखील करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने फडणवीसांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पांडुरंगाकडे साकडं देखील घातलं.
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील गेल्या १२ वर्षांपासून पंढरीची नियमित वारी करणारे शेतकरी कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा प्रतिनिधी म्हणून सन्मान मिळाला आहे. पंढरीच्या विठोबाच्या चरणी उगले दांपत्याने भक्तिभावाने ही पूजा अर्पण केली असून, त्यांच्या या सहभागामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.