सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प केल्यास नळपट्टी कमी होणार : आ. महेश शिंदे
पंचायत राज्याचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीने महसूल वृद्धीसाठी लोक उपयोगी प्रकल्प राबवावेत. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प केल्यास पाण्याची बचत होऊन नळपट्टी कमी होणार आहे.
सातारा : पंचायत राज्याचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीने महसूल वृद्धीसाठी लोक उपयोगी प्रकल्प राबवावेत. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प केल्यास पाण्याची बचत होऊन नळपट्टी कमी होणार आहे. त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला महसूल वाढवावा असे आवाहन कोरेगाव मतदारसंघाचे आमदार व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी केले.
तसेच भविष्यात सातारा शहरालगतच्या हद्दीबाहेरील ग्रामपंचायतचा नगरपंचायत असा प्रस्ताव बनवून त्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊ असे आश्वासन दिले. समर्थ नगर येथील महेश शिंदे यांच्या फंडातून एक कोटी साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी समर्थ नगर ग्रामपंचायतच्या उपसरपंच संगीता माने, सदस्य विद्या हिरेमठ, सुप्रिया मोरे, शुभांगी डोरले, संजय भोसले, ग्रामपंचायत विकास अधिकारी आरडी माने इत्यादी यावेळी उपस्थित होते.
समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये निशिगंधा कॉलनी ते चैताली कॉलनी रिमिक्स कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी महेश शिंदे यांनी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समर्थ नगर ग्रामपंचायतच्या वतीने आमदार महेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार महेश शिंदे यांनी यावेळी विकास कामांची बारकाईने पाहणी केली. सर्व रस्त्यांची त्यांनी पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना दिल्या. ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त महसूल देणारे लोक उपयोगी प्रकल्प राबवेत तसेच प्रत्येक वार्डामध्ये आयुर्वेदिक झाडांची लागवड करावी याशिवाय सांडपाणी प्रकल्प प्रक्रिया केंद्र उभे करावेत जेणेकरून ग्रामपंचायतीचा महसूल वाढेल. आयुष्यात जर आयुर्वेद अंगीकारला नाही तर आयुष्य संपुष्टात यायला वेळ लागणार नाही असे गांभीर्य सुद्धा त्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी महेश शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांकडून पायाभूत सुविधा समाज मंदिरे तसेच स्ट्रीट लाईट या सुविधांची मागणी झाली त्यावेळी बोलताना महेश शिंदे म्हणाले सातारा शहराच्या जवळपास असणाऱ्या हद्दीबाहेरील ग्रामपंचायतीचे एकत्रीकरण करून नगरपंचायतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करू आणि त्या माध्यमातून लोकांनाजॉगिंग ट्रॅक सायकल ट्रॅक समाज मंदिरे स्टेडियम अशा जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. येथील निशिगंधा कॉलनी आणि चैताली कॉलनी मधील नागरिकांनी आमदार महेश शिंदे यांचा विशेष सत्कार केला.