मेढा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक डायलेसिस सेवा केंद्र सुरु
दुर्गम व डोंगराळ जावली तालुक्यात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून मेढा ग्रामीण रुग्णालय येथे अत्याधुनिक डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सातारा : दुर्गम व डोंगराळ जावली तालुक्यात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून मेढा ग्रामीण रुग्णालय येथे अत्याधुनिक डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ग्रामीण रुग्णालयाला पाच डायलेसिस मशीन उपलब्ध झाले असून जावली तालुक्यातील मूत्रपिंड विकार (किडनी विकार) रुग्णांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे. यामुळे तमाम जावलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातही या आजाराचे असंख्य रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सुविधा केंद्र उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा सातारा, पुणे, मुंबई आदी शहरांवर अवलंबून राहावे लागते. जावली तालुक्यातील रुग्णांना मोफत डायलेसिस सुविधा मेढा ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध व्हावी यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय आरोग्य अभियान भारत सरकारकडून मेढा रुग्णालयासाठी अत्याधुनिक ५ मशीनचे डायलेसिस सुविधा केंद्र मंजूर झाले असून या रुग्णालयात ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
मेढा ग्रामीण रुग्णालयात एकाच वेळी ५ रुग्णांना डायलेसिस सुविधा मिळणार आहे. या सेवेमुळे जावली तालुक्यातील रुग्णांना इतर ठिकाणी जाण्याची वेळ आता येणार नाही, हि सुविधा किडनी विकार असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे. तसेच ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे तालुक्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांवरील ताण कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जावली तालुक्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात विविध आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंत्रालयातील आपल्या कक्षामधून मुख्यमंत्री सहायता निधी विभागातून विविध आजाराच्या रुग्णांना आर्थिक साहाय्य व मदत मिळवून दिली जात आहे. तालुक्यातील गरजू रुग्णांनी मेढा येथे सुरु झालेल्या डायलेसिस सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.