आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी 100 टक्के मतदान करावे
युवकांचे राष्ट्र म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. त्यामुळे देशाच्या लोकशाहीला युवकच बलशाली करू शकतात. आत्मनिर्भर आणि वैभवशाली राष्ट्रासाठी युवकांनी 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले.
सातारा : युवकांचे राष्ट्र म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. त्यामुळे देशाच्या लोकशाहीला युवकच बलशाली करू शकतात. आत्मनिर्भर आणि वैभवशाली राष्ट्रासाठी युवकांनी 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले.
समर्थ एज्युकेशनल ट्रस्टच्या सावकार आयुर्वेदिक कॉलेज व होमिओपॅथी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीकांत काशीकर यांनी स्वागत केले. तर प्रा. तृप्ती नलगे प्रास्ताविक केले. या वेळी डॉ.शीतल इनामदार उपस्थित होत्या. पूनम महाजन म्हणाल्या, "स्वातंत्र्याच्या शंभरीत भारताला जर महासत्ता व्हायचा असेल, तर आजच्या युवकांनी मोठी स्वप्न बघित, त्याला परिश्रमाची जोड द्यायला हवी. गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप, सिलिकॉन हब सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून भारताला महासत्ता बनवण्याच्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत."
जागतिक राजकारणात भारताची भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे भूमिका महाजन यांनी मांडली. त्या म्हणाल्या, "रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा जी20 सारखी परिषद, यामध्ये भारताची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे. अनेक देशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारत एक मोठी संधी असणारे द्वार झाले आहे. फक्त याला भारतातील युवकांचा आत्मविश्वास व परिश्रमांची जोड दिली तर भारत लवकरच आर्थिक दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर येईल".
पुढे बोलताना त्यांनी "कौशल्यमेव जयते "असा मंत्र युवकांच्या समोर ठेवला. "आपल्या कामाला कौशल्याची व परिश्रमाची जोड दिली तर आकाश सुद्धा आपल्याला कमी पडेल" अशा पद्धतीच्या संधी युवकांच्या समोर पुढील काळामध्ये येणार आहेत त्यामुळे सर्व युवकांना तयार राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळेला केले.
विद्यार्थिनी तेहरीम खान हिने आभार मानले.