नवसमाज निर्मितीचे भरीव कार्य सत्यशोधक समाजाने केले : सौ भारतीताई गोरे
समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदलित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विषमता नष्ट करणे , तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
खंडाळा : समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदलित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विषमता नष्ट करणे , तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सर्वांसाठी खुला होता. मानवता धर्माची शिकवण, समता, बंधुता, शिक्षण, लोकप्रबोधन, लोकजागरण, लोकसंघटन व नवसमाज निर्मितीसाठी सत्यशोधक चळवळीने खूप मोठे योगदान दिले आहे. सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळून विद्यादान, सदाचरण, व्यसने व कर्ज याबाबत आपले विचार परखडपणे मांडले. सावित्रीबाईंचे हे विचार आजही महत्त्वाचे असून आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात, असे प्रतिपादन सौ. भारतीताई गोरे सामाजिक कार्यकर्त्या यांनी व्यक्त केले.
सत्यशोधक समाजाच्या 152 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि सातारा प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगाव येथे सुजन फाउंडेशन यांच्या महात्मा फुले विचार अभियान या विशेष उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मारकामध्ये अभिवादन करून कार्यक्रमास शुभारंभ झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ भारतीताई गोरे सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. उज्वला हातागळे पुणे, नायगाव ग्रामपंचायतच्या सदस्य सौ.साधना नेवसे,सौ. रेश्मा कानडे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अध्यापिका महाविद्यालय नायगाव माजी प्राचार्य सौ. मंगल नेवसे मान्यवर उपस्थित होते.
सद्यस्थितीमध्ये महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचाराचे कृतिशील आचरण करून शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे प्रसारक व्याख्याते एडवोकेट बिभीषण गदादे यांनी स्वतः सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध होऊन समाजासमोर आदर्श व प्रेरणा निर्माण केली.याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
फुले दाम्पत्यांनी शिक्षण व स्त्री शिक्षण या क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कार्याचे फलित म्हणून आज पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन महिला विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या महिलांच्या प्रति सामाजिक कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रा. डॉ. उज्वलाताई हातागळे पुणे,सौ. मेघा टिळेकर लेखिका पुणे, सौ भारतीताई गोरे सामाजिक कार्यकर्ते सातारा,सौ शितल शेळके अध्यक्ष ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरितक्रांती महिला सहकारी पतसंस्था लोणंद, कुमारी कल्याणी रणसिंग जयंत सोशल फाउंडेशन पुणे, सौ.सपना शिंदे विश्वस्त श्री शांतिगिरी जी महाराज सेवा प्रतिष्ठान मलवडी यांचा मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत नायगाव व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सहकारी महिला पतसंस्था खंडाळा यांना यांच्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. भारतीताई गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त मान्यवर डॉ. उज्वला हातागळे,सौ मेघा टिळेकर, सौ मंजिरी देवधर, एडवोकेट बिभिषन गदादे,श्री रघुनाथ शेळके सर यांनी फुले दाम्पत्या यांचे कार्य, सत्यशोधक चळवळ कार्य, थोर महापुरुष व स्वातंत्र्य संग्रामतील क्रांतिकार्याला उजाळा दिला. आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील व फुले दांपत्य यांची प्रतिमा देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी रीतीने संपन्न करण्यासाठी ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता सौ. यशोदा बनकर ग्राम विकास अधिकारी, श्री विलास नेवसे, श्री विलास सुतार, सौ.शर्मिला कानडे, सीमा अडसूळ, माधुरी बोराटे शंकर टिळेकर, प्रताप बोराटे, सौ.रूपाली नेवसे, विशाल नेवसे, किशोर ननावरे,किशोर पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ उज्वलाताई तांबे व सूत्रसंचालन अजित जाधव संयोजक महात्मा फुले विचार अभियान यांनी केले. उपस्थित सर्व समाज मनाचे आभार सुमन अडसूळ यांनी मानले.