बकासूर-सर्जा या बैलजोडीने श्री यमाई केसरी’चा किताब पटकावला
महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री यमाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘श्री यमाई केसरी’ बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
औंध : महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री यमाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘श्री यमाई केसरी’ बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मोहितशेठ धुमाळ यांचा बकासूर व कै.रणजीत निंबाळकर सर यांचा सर्जा या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे एक लाख रुपयांचे रोख बक्षीस ढाल व चषक जिंकून ‘श्री यमाई केसरी’चा किताब पटकावला.
येथील खरशिंगे रोड जवळ असलेल्या सरकारी मळा मैदानात सकाळी आठ वाजता गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या बैलगाडी शर्यत शौकिनांनी गर्दी केली होती. शासनाच्या सर्व नियम व अटींना अधीन राहून पार पडलेल्या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन राऊंड शर्यत होती. शर्यतीला 475 गाड्यांची नोंद होऊन गटाचे एकूण 54 फेरे व सेमी फायनलच्या सात फेर्या झाल्या. कमिटीच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे एका दिवसात उजेडात फायनलचा फेरा झाला.
दुसर्या क्रमांकापासून विजयी गाडी मालकांची नावे पुढीलप्रमाणे सागर शेठ कटरे कटरेवाडी, कटरेवाडी घाणद, जहांगीर शेठ खरसुंडी, सिद्धिविनायक प्रसन्न रणजीत निंबाळकर व मयुरी रणदिवे औंधकर, सोनाली एंटरप्राइजेस चर्हेगावकर, संस्कार शिंदे करवडी, प्रमोद जाधव, स्वामी समर्थ कळंबी, भैरवनाथ प्रसन्न हिंदकेसरी संभाजी आबा काले आणि पाटकळकर. मैदानात जातिवंत खिलार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवयास मिळाला. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते. सेमी फायनलमध्ये दोन नंबर करणार्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह तर गट विजेत्या प्रथम बैलगाडी साठी सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी, रोहन खन्ना, संदीप मांडवे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, प्रशांतराव खरमोडे, दीपक नलवडे, अमरशेठ देशमुख, गणेश देशमुख, गणेश हरिदास, दाजी गायकवाड, तानाजी इंगळे उपस्थित होते. शर्यत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनिल माने, संतोष जायकर, धनाजी गायकवाड, महादेव माने, आदेश माने, धनाजी यादव, सतीश सुतार, दशरथ कुंभार, आशिष देशमुख, अशोक यादव यांनी परिश्रम घेतले.