फटाक्यांचा धूर नाका-तोंडात गेल्याने शरीरावर होतो गंभीर परिणाम
दिवाळी सुरू झाली आहे. फटाके हा दिवाळीतला जणू अनन्यसाधारण भाग बनला आहे. पण दुसरीकडे बदलत्या काळाबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. त्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
दिल्ली : दिवाळी सुरू झाली आहे. फटाके हा दिवाळीतला जणू अनन्यसाधारण भाग बनला आहे. पण दुसरीकडे बदलत्या काळाबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. त्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
राजधानी दिल्लीसारख्या शहरांत प्रदूषणामुळे फटाक्यांवर बंदी आहे. बंदी असली तरी फटाके फुटणं मात्र अद्याप थांबलेलं नाही.
शिवाय इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात फटाके फुटतात. फटाक्यांचा धूर आकाशात पसरत असतो. या फटाक्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. नेमके कोणत्या स्वरुपाचे दुष्परिणाम होतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कोणत्या घटकांचा काय होतो परिणाम?
फटाक्यांमध्ये अनेक प्रकारचे घातक घटक असतात. शिवाय त्याच्या धुरामुळं पसरणाऱ्या विषारी वायूंचाही शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालामध्ये फटाक्यांमधील घटक आणि त्यांचे दुष्परिणाम यांची माहिती दिली आहे.
• शिसं - शिसं या घटकामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. ते गरम होतं तेव्हा त्यातून विषारी वाफा येतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये गतिमंदत्व येतं किंवा मेंदूचं नुकसान होतं.
• मॅग्नेशियम - मॅग्नेशियममुळे सुद्धा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तसंच त्यामुळे मेटल फ्युम फिव्हर नावाचा एक आजार होतो. त्याचे तुकडे त्वचेच्या आत गेले तर गॅस गँगरिन नावाचा रोग होतो.
• जस्त (झिंक) - जस्त शरीराला हानिकारक नसलं तरी त्यातून निघणारी वाफ शरीराला हानिकारक असते.
• सल्फर (SO4) - सल्फरमुळे श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला इजा होते. त्यामुळे फुप्फुसांवर सूजही येऊ शकते.
• नायट्रेट - हा अतिशय ज्वलनशील घटक आहे आणि त्यातून अतिशय विषारी वाफा येऊ शकतात. पोटात कळा येणं, गुंगी येणं, उलट्या, अशक्तपपणा या सर्व गोष्टी होऊ शकतात.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळं हवेतील कार्बन मोनोक्साइड, हायड्रोकार्बन्स, सल्फर डायऑक्साइड इत्यादींचं हवेतलं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं.
गरोदर स्त्रिया, लहान मुलं आणि अस्थमाचे रुग्ण यांना या काळात सर्वाधिक त्रास होतो, असं अनेक संशोधनात आढळून आलं आहे.
हवेतील सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर्स (SPM) यांची पातळी वाढल्यामुळे घसा, नाक आणि डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्धवतो आणि मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो.
ज्या लोकांना हृदयरोग, श्वसनाचे विकार आणि मज्जासंस्थचे विकार असतात, तसेच सर्दी, खोकला, आणि ॲलर्जी असणाऱ्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो.
फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण त्याचबरोबर त्यामुळे होणारा आवाज हा आणखी एक मोठा धोका आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण नैसर्गिक स्रोत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आवाजाच्या पातळीसाठी दिवसाला 60 डेसिबल आणि रात्री 50 डेसिबल्स इतकी मर्यादा आखून दिलेली असते.
फटाक्यामुळे ही मर्यादा 140 डेसिबल्सपर्यंत जाते. 85 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजामुळं ऐकायला त्रास होतो. आवाज वाढल्यामुळे अस्वस्थता, तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, उच्च रक्तदाब आणि अस्वस्थ झोप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
पुण्यातील नेत्रतज्ज्ञ डॉ. वैजयंती गद्रे यांनी फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली. त्या म्हणतात, “सध्या बाजारात विविध प्रकाराचे फटाके उपलब्ध आहेत. त्यातून विषारी गॅसेस बाहेर पडतात. त्यामुळे डोळ्याला खाज येणं, डोळे चुरचुरणं, डोळे कोरडे होणं असे परिणाम होतात.
रोषणाई किंवा आतषबाजी पहायला जाताना प्रोटेक्टिव्ह गॉगल घालावेत.
रोषणाईचे जे फटाके असतात, त्यानेही डोळ्यांना इजा होऊ शकते. फटाक्यात पोटॅशिअम नायट्रेट, पोटॅशिअम क्लोरेट, सल्फर असे मुख्य पदार्थ असतात. त्यामुळे डोळ्यांना दुखापत होते.
जळलेला फटाका डोळ्यात गेला तर जखम होते. पापणीला चीर पडणे, पापणीची त्वचा फाटणे, बुबुळाला इजा होणं अशा जखमा होतात, अगदी डोळाही निकामी होऊ शकतो.”
फटाक्यांमुळे दीर्घकाळाचा ब्राँकायटिस, अस्थमा, सायनुसायटिस, न्यूमोनिया आणि लॅरिंजायटिससारखे विकार उद्भवू शकतात.
मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील कान-नका-घसा तज्ज्ञ डॉ. शीतल राडिया म्हणाल्या, “फटाक्यांचा सर्व शरीरावर परिणाम होतोच, पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम कानावर होतो. कारण फटाक्यामुळे 140 डेसिबल्स इतका आवाज निर्माण होतो.
त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो किंवा कायमचा बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. अनेक लोकांमध्ये मोठा आवाज ऐकल्यामुळे अचानक अस्वस्थता वाढलेली बघायला मिळते.”
नाकावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “फटाक्यांमधील प्रदूषण करणाऱ्या घटकांमुळे नाक हुळहुळणं, खाजवणं असे प्रकार होतात. सायनसचा त्रास असलेल्या लोकांना फटाक्यांचा सर्वांत जास्त त्रास होतो.
फटाक्यामुळे जी रसायनं बाहेर पडतात त्यामुळे सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे सायनसचा त्रास वाढण्याची शक्यता असते.”
फटाक्यातून निघणाऱ्या लहान कणांमुळे फुप्फुसांनाही त्रास होतो. वेगवेगळ्या अॅलर्जीज् होऊ शकतात. घशात जळजळ होते, घशात खाजवल्यासारखं होतं, खोकला होतो. असं त्या म्हणाल्या.
याबरोबरच डोळ्यांवरही त्याचा प्रचंड परिणाम होतो. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणं असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं डॉ. राडिया म्हणाल्या.