मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे दि १२ व १३ सप्टेंबर रोजी शेंद्रे येथे आयोजन
सातारा रनर्स फौंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेली "जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन" रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून, या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल ८००० धावपटूंनी नोंदणी केली आहे.
सातारा : सातारा रनर्स फौंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेली "जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन" रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून, या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल ८००० धावपटूंनी नोंदणी केली आहे.
या मॅरेथॉनचा भव्य एक्स्पो शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर व शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असून, हा एक्स्पो पुढील वेळापत्रकानुसार खुला असणार आहे.
शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.००
शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००
शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुल येथे या भव्य एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोचे उद्घाटन शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीमती छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले वहिनीसाहेब व मा श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे व सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांनी संयुक्तरीत्या दिली.
या एक्स्पोमध्ये धावपटूंना मॅरेथॉनसाठी आवश्यक असणारे रेस किट वितरित केले जाणार असून, त्यामध्ये टी-शर्ट, रनिंग बीब, संगणकीकृत टायमिंग चिप आदींचा समावेश आहे.
एक्स्पोच्या दिवशी स्पर्धकांना त्यांचे रेस किट मिळण्यासाठी मॅरेथॉनची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो “क्यूआर कोड” आला असेल, तर तो “क्यूआर कोड” स्कॅन केला तर तुम्हाला तुमचे बिब मिळू शकते. त्याबरोबरच नोंदणीचा पुरावा म्हणून आपल्याला प्राप्त झालेला ई-मेल अथवा मोबाईलवरील संदेश दाखवणे आवश्यक आहे. तसेच वय व रहिवासी पत्त्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे, असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी केले आहे.
स्थानिक सातारकर धावपटूंनी आपले रेस किट शक्यतो पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी ताब्यात घ्यावे, यामुळे दुसऱ्या दिवशी बाहेरगावच्या स्पर्धकांना रेस किट सहजपणे घेता येईल व गर्दी टाळली जाईल व सर्वांच्या सोयीसाठी व्यवस्था अधिक सुरळीत राहील, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे यांनी संयोजन समितीच्यावतीने केले आहे.
या एक्स्पोमध्ये देशभरातील अनेक नामांकित आस्थापना त्यांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारणार असून यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे शूज, स्पोर्ट्सवेअर तसेच फिटनेसशी संबंधित इतर सर्व साहित्य उपलब्ध असेल. याठिकाणी असणाऱ्या फूड कोर्टमध्ये संतुलित, आरोग्यासाठी पोषक व चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल.
जरी काही सातारकर नागरिकांनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली नसली, तरीदेखील सर्वसातारकरांसाठी हा एक्स्पो खुला असून या भव्य एक्स्पोला सर्व सातारकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.