महाबळेश्वर तालुक्यात नाकिंदा हद्दीमध्ये वृक्षतोड
पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात नाकिंदा हद्दीमधील हनीवूड हॉटेल शेजारील सर्वे नं 22/ब/6 या चेरी रैना कौल यांच्या जागेमध्ये अनेक वृक्षांची तोड करण्यात आली आहे.
महाबळेश्वर : पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात नाकिंदा हद्दीमधील हनीवूड हॉटेल शेजारील सर्वे नं 22/ब/6 या चेरी रैना कौल यांच्या जागेमध्ये अनेक वृक्षांची तोड करण्यात आली आहे. या वृक्षांमध्ये जांभळ, गेळा, अंजन, मेडसिंग, भोमा, आंबुळगी अशा विविध प्रजातीच्या तीस ते चाळीस वृक्षांचा समावेश आहे. स्थानिकांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर महसूल विभागाने पंचनामा करत कागदे रंगवण्याचे काम केले. मात्र, इतक्या मोठया संख्येने झाडे तोडणार्या धनिकावर गुन्हा दाखल होणार का? असा सवाल केला जात आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावातील एक बांधकाम व्यावसायिक असलेल्या व्यक्तीने ही वृक्षतोड आर्थिक फायद्यासाठी केल्याची चर्चा आहे. याच बांधकाम व्यावसायिकाने महाबळेश्वर ते वेण्णालेक मुख्य रस्त्यावर एका हॉटेल शेजारील जंगलामधील झाडे तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पत्रकार व पर्यावरण प्रेमींमुळे हा प्रयत्न फसला होता. महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. येथील पर्यावरणाच्या रक्षणासाठी कडक नियम असून पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवून येथील बांधकामावर देखील कडक निर्बंध घालण्यात आले आहे. आता येथे सहजासहजी कोणालाही बांधकाम परवानगी मिळत नाही. त्यासाठी मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागते.
बेकायदेशीर बांधकाम व विनापरवाना वृक्षतोड यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने येथे अनेक कमिट्यांची स्थापन करण्यात आल्या आहेत.याला न जुमानता ही वृक्षतोड करण्यात आली आहे. इतकी मोठी वृक्षतोड कशी काय झाली? ही वृक्षतोड कोणी केली? ज्याने वृक्षतोड केली त्याच्यावर महसूल विभाग गुन्हा दाखल करणार का? असे सवाल आता केले जात आहे. वृक्षतोडीचे प्रकार समोर आल्यानंतरही काही अधिकारी नियमातील पळवाटांचा आधार घेवून सेटिंग करून हात ओले करतात. यामुळेच अनेक निर्बंध असूनही येथे मोठया प्रमाणावर वृक्षतोड करून अनधिकृत इमले उभे राहत आहेत.
वृक्षतोडीनंतर त्याच जागी इमारती
वृक्षतोड झाल्यानंतर एखादा पंचनामा होतो नोटीस अथवा दिखाव्यासाठी एखादा गुन्हा दाखल केला जातो. मात्र, त्याच परिसरात पुन्हा मोठं मोठी इमले उभे राहतात. हा यापूर्वीचा अनुभव आहे. यापूर्वीही याच भागात वृक्षतोड होवून अनाधिकृत बांधकाम झाल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात महसूल विभाग काय कारवाई करणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.