अमित ठाकरे आमदार होणार ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे आमदार होणार असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. कारण नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ठाकरेंच्या निवासस्थानी भेट झाली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे आमदार होणार असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. कारण नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ठाकरेंच्या निवासस्थानी भेट झाली. ही भेट सदिच्छ भेट असल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे. पण यावेळी राजकीय चर्चा झाल्याचंही कळतंय. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप मनसे यांच्यात युती होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क इथं आयोजित एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी जवळच असलेल्या राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांनी ठाकरे परिवाराची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.
राज्यपाल नियुक्त आमदार
दरम्यान, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता यामध्ये कोणा कोणाचा समावेश असणार याची चर्चा सुरु झाली आहे. या यादीत अमित ठाकरे यांच्या नावाची समावेश होऊ शकतो. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर आमदार करण्याची तयारी सुरु झाल्याची चर्चा आहे. त्यासाठीच आजची फडणवीस-ठाकरे भेट महत्वाची मानली जात आहे.
मनसे महायुतीत येणार का?
मनसेनं महायुतीत सामिल व्हावं अशी इच्छा भाजपच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच व्यक्त केली होती. परंतून मनसेनं स्वतंत्ररित्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत माहिम-दादर मतदारसंघातून अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
पण आपल्या घरच्या मैदानावर मुलगा अमित ठाकरेंना आपण निवडून आणू शकलो नाही याचं शल्य राज ठाकरे यांच्या मनात असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळेच आता भाजपच्या मदतीनं अमित ठाकरे विधानपरिषदेवर आमदार होऊ शकतात, असंही भाकीत वर्तवलं जातंय.