ऐन दिवाळीच्या तोंडावर शाहूनगरमध्ये पाण्याची बोंबाबोंब
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा नाका येथील जलवाहिनीची दुरुस्ती अद्याप सुरू असल्याने गेल्या तीन दिवसापासून शाहूनगर परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे. प्राधिकरणाच्या या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा नाका येथील जलवाहिनीची दुरुस्ती अद्याप सुरू असल्याने गेल्या तीन दिवसापासून शाहूनगर परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे. प्राधिकरणाच्या या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सातारा जिल्ह्यात आचारसंहितेची लगबग सुरू असताना नागरिकांच्या प्राथमिक सुविधांकडे लक्ष देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ नाही तर, नगरपालिकेच्या परिवहन विभागाचे कर्मचारी उद्धट उत्तरे देत असल्याने नक्की दाद कोणाला मागायची, असा प्रश्न पडला आहे.
विसावा नाका येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून जलवाहिनीच्या अतिरिक्त दाबामुळे काही ठिकाणी व्हॉल्वच्या भागांमध्ये तडे गेले आहेत. .त्यामुळे पाण्याचे जोरात फवारे रस्त्यावर येत असून पुढे पाणीपुरवठा होईनासा झाला आहे. प्राधिकरणाने या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती हाती घेतली. मात्र शुक्रवारपासून ही दुरुस्ती सुरू असून अद्यापही ती गळती दुरुस्त करण्यात यश आलेले नाही. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवले आहे. येथील माहुली सब स्टेशन मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने त्याचा थेट परिणाम जल उपशावर होत आहे. त्यामुळे शहर परिसरातील 13 टाक्या भरण्यास प्रचंड विलंब होत आहे. प्राधिकरणाचे अभियंता शाखा अभियंता हे थेट ठेकेदारावर जबाबदारी ढकलून मोकळे होतात.
सणासुदीच्या तोंडावर नागरिकांना पाणी मिळत नसल्याने शाहूनगर परिसरात संतापाचे वातावरण आहे. कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे यांच्याशी संपर्क साधला तरी त्या फोनला प्रतिसाद देत नाहीत. रविवारी सुट्टीचा दिवस असला तरी पाणीपुरवठा हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे तातडीची व्यवस्था करण्याची संवेदनशीलता अधिकारी मात्र दाखवत नाहीत. साताऱ्यात विधानसभा निवडणुकांची गडबड सुरू आहे. अशावेळी पायाभूत सुविधांसाठी नागरिक झगडताना दिसतात. शाहूनगर परिसरात नगरपालिकेचे टँकर सुद्धा मोफत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हजार-हजार रुपये मोजून नागरिकांना स्वतःच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. याबाबतही नागरिकांमध्ये सामूहिक संताप व्यक्त होत आहे.