डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट
जिल्ह्यात सातारा व कोरेगावमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. सध्या 55 जण डेंग्यूने आजारी आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
सातारा : जिल्ह्यात सातारा व कोरेगावमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. सध्या 55 जण डेंग्यूने आजारी आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. मात्र डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून गावोगावी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्यस्थितीत डेंग्यूचे 55, हिवतापचे 33, चिकनगुण्याचे 17 रुग्ण आहेत. ज्या ठिकाणी डेंग्यूसह अन्य रुग्ण सापडले आहेत तेथील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या मदतीने धूर फवारणी करण्यात येत आहेत. तसेच घरोघरी हिवताप कार्यालयामार्फत सर्व्हेही करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी संशयित रूग्ण आढळून येत आहेत. त्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत औषधे पुरवण्यात येत आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात जानेवारी ते जून दरम्यान 1 हजार 421 जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागामार्फत घेण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 402 जणांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात हिवतापांचे 33 रुग्ण, डेंग्यूचे 77 तर, चिकुनगुन्याचे 17 रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागामार्फत संबंधित ठिकाणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच रुग्णावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत देण्यात आली.
अचानक थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, हाडं, सांध्यामध्ये वेदना, मळमळ, अंगावर सूज व चट्टे येणे, तापासोबतच रक्तस्त्राव होण्याचा धोका, शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यामधून रक्तस्त्राव, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणे, सतत तहान लागणे, अशक्तपणा, गंभीर स्थितीत रुग्णांच्या मेंदू, फुफ्फुसं किंवा किडणीवर परिणाम आदी लक्षणे आढळून येतात.