वरंध घाटात भीषण अपघात
पुणे जिल्ह्यातील भोर येथे भोर-महाड महामार्गावर असणाऱ्या वरंध घाटात एक भीषण अपघात झाला. यामध्ये इको कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला.
भोर : पुणे जिल्ह्यातील भोर येथे भोर-महाड महामार्गावर असणाऱ्या वरंध घाटात एक भीषण अपघात झाला. यामध्ये इको कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. महाडवरून भोरच्या दिशेने इको ही कार येत होती. तेव्हा ही दुर्घटना घडल्याची माहिती दिली जात आहे.
शुभम शिर्के असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, मंगेश गुजर (वय २६) , आशिष गायकवाड (वय २९), सिद्धार्थ गंधणे (वय २६), सौरभ महादे (वय २२), गणेश लवंडे (वय २७), अमोल रेकीणरं (वय २७), यशराज चंद्र (वय २२), आकाश आडकर (वय २५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चारचाकी इको कार 100 फूट खोल दरीत कोसळल्याची भीषण घटना घडली आहे. वाहनचालकाचा वळणावर अंदाज चुकल्याने ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. इतरांनी सतर्कता दाखवल्याने त्यांचे जीव वाचले आहेत, अशी माहिती आहे.
दरम्यान, गाडीतील लोक एका कामानिमित्त ते भोरच्या दिशेने निघाले होते, अशी माहिती आहे. पण, वरंध घाटात असणाऱ्या एका वळणावर चालकाचा अंदाज चुकला आणि हा अपघात झाला. याबाबतची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाडवरून भोरच्या दिशेने इको कार येत होती. त्यात नऊपेक्षा अधिक जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. इको गाडी वरंध घाट परिसरात असणाऱ्या उंबरडे गावाजवळ पहाटे चारच्या सुमारास ही गाडी 100 फूट खोल दरीत कोसळली. वाहनचालकाचा वळणावर अंदाज चुकल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत वर रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.