'या' मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना
राष्ट्रवादी पक्षाचे दोन स्वतंत्र गट झाल्यानंतर फलटण व वाई या दोन विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट प्रथमच आमने- सामने येत आहेत. सातारा जिल्हा शरद पवारांना मानतो, तर अजित पवार यांचा सुद्धा कार्यकर्ता वर्ग येथे मोठा आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातून कोणत्या पवारांच्या विचारांना सातारा जिल्हा साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातारा : राष्ट्रवादी पक्षाचे दोन स्वतंत्र गट झाल्यानंतर फलटण व वाई या दोन विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट प्रथमच आमने- सामने येत आहेत. सातारा जिल्हा शरद पवारांना मानतो, तर अजित पवार यांचा सुद्धा कार्यकर्ता वर्ग येथे मोठा आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातून कोणत्या पवारांच्या विचारांना सातारा जिल्हा साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा मतदार संघ वाटपाचे विषय जवळपास संपले आहेत. सर्वात मोठ्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर या मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी दंड थोपटले आहेत. येथे थोरल्या पवारांनी अत्यंत हुशारीने बावधन गटातील शशिकांत पिसाळ यांच्या पत्नी अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीसंदर्भात प्रचंड राजकीय खल झाला. वाई विधानसभा मतदारसंघात पवारांना मानणारा फार मोठा वर्ग आहे.
शिरवळमध्ये रामराजे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. डॉ. नितीन सावंत यांनी सुवर्ण गाथा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठे जाळे विणलेे आहे. महाबळेश्वर व भुईजमध्ये माजी आमदार मदनराव पिसाळ यांची ताकद आहे. महाविकास आघाडी की महायुती याचे पत्ते अद्याप मदन पिसाळ यांनी ओपन केलेले नाहीत. या बाबी जर जुळल्या तर अरुणादेवी पिसाळ यांचे मोठे आव्हान मकरंद पाटील यांना मिळू शकते.
फलटण मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून रामराजे समर्थक विद्यमान आमदार दीपक चव्हाण तर महायुतीकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक सचिन कांबळे पाटील उमेदवार रिंगणात आहेत. फलटणमध्ये खरी लढत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशीच आहे. मात्र पक्षीय लेबल जर पाहिले तर पवार विरुद्ध पवार अशी रंगतदार लढत येथे होणार आहे.
दाेन्ही निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला
फलटणमध्ये रामराजे म्हणतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती आहे, मात्र दरम्यानच्या काळात बरेच कार्यकर्ते त्यांना सोडून महायुतीमध्ये दाखल झाले होते. मात्र रामराजे वगळता त्यांनी आपली सर्व रसद शरद पवारांच्या मागे उभी केली आहे. तर येथे आपला वरचष्मा तयार करण्यासाठी अजित पवार यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळ केले आहे. त्यामुळे वाई आणि फलटण या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना राहणार आहे. यात दाेन्ही निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
काेणत्या पवारांना साथ मिळणार?
साताऱ्यात झालेल्या पावसातील सभेने राज्याच्या राजकारणात इतिहास घडवला होता. अजित पवार यांनीही साताऱ्यात आपली कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. वाईमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना खासदारकी देऊन अजित नवार यांनी मास्टर स्ट्रोक मारला आहे. त्यामुळे वाई आणि फलटण या दोन मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार आहे. जनता काेणत्या पवारांना साथ देते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.